Headlines

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे- देसाई:शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास होईल मदत‎




महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी गरजेपेक्षा अधिक साखर उत्पादन करण्याचा अट्टाहास न करता जागतिक स्तरावर वाढती मागणी असलेल्या इथेनॉल निर्मितीकडे वळावे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपयांहून अधिक दराचा लाभ मिळू शकतो, असे प्रतिपादन इथेनॉल चळवळीचे जनक तथा जैविक इंधन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्यामराव देसाई यांनी केले. स्थानिक श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात दिवंगत झुंबरलाल करवा व प्रा. कमलनयन करवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित १९व्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशदास राठी छात्रालय समितीचे उपाध्यक्ष जुगलकिशोर गट्टाणी होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्यामराव देसाई, अस्पा बंड सन्स चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत बंड, प्रकाश हेडा हे होते तर, प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारीणी सदस्य श्यामसुंदर दम्माणी, श्रमराज्य परीषदेचे अध्यक्ष अरविंद नळकांडे व शोभा करवा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. देसाई म्हणाले की, ऊस, मका आणि ज्वारी यांसारख्या पिकांपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच अस्पा बंड सन्सचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत बंड यांनी ‘इथेनॉल आणि ऑटोमोबाईल इंजिन’ या विषयावर मार्गदर्शन केले. भविष्यात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने तयार होण्याची शक्यता व्यक्त करताना त्यांनी वाहनांचे आयुष्यमान संपल्यानंतर उद्भवणाऱ्या काही तांत्रिक समस्या इथेनॉलमुळे निर्माण होत नाहीत, असे नमूद केले. भविष्यातील इंधनव्यवस्थेसाठी इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय असून वाहनचालकांनी इथेनॉलबाबत होणाऱ्या अपप्रचारापासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भांगडिया यांनी प्रास्ताविक केले, यशस्वीतेसाठी डॉ. सुनील मावसकर, डॉ. अनिलकुमार प्रसाद, डॉ. ज्योती भुतडा, प्रा. डॉ. आकीब देशमुख आणि प्रा. डॉ. राजू वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. आकीब देशमुख यांनी केले. यावेळी भारतीय किसान संघाचे विदर्भ संघटन मंत्री संजय कुळकर्णी (नागपूर), रयत शेतकरी संघटनेचे प्रमुख अच्युत गंगणे, नारायण पांडे (बीड), लोकसंघर्ष संघटनेचे प्रमुख दिलीप देशमुख, शेतकरी नेते प्रकाश बोनगीरे, दिवाकर देशमुख, गजानन अमदाबादकर (अकोला), जैव इंधन शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुजाता देसाई, डॉ. मनीषा शिंदे (कोल्हापूर), डॉ. मृणालिनी बुटुकने (पुणे), अनिल इंगळे (यवतमाळ), माजी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मंगेश देशमुख (कल्याण) आदी उपस्थित होते. अवलंबित्वच कमी होणार नाही; चलन खर्च वाचेल ब्राझीलमध्ये १९७५ पासून इथेनॉलचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. भारतानेही याच धर्तीवर इथेनॉलचा वापर वाढवल्यास परकीय इंधनावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. यामुळे देशाचा प्रचंड परकीय चलन खर्च वाचेल आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेला अधिक मजबूती व स्थैर्य प्राप्त होईल, असे मत डॉ. देसाई यांनी व्यक्त केले. तर, इथेनॉल निर्मिती आणि वापरास प्रोत्साहन दिल्यास केवळ परदेशी इंधनावरील अवलंबित्वच कमी होणार नाही, तर देशांतर्गत कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळून ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी बनेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *