Headlines

महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला:दिवसा उन्हाचा चटका, सकाळी गारवा; शेतकऱ्यांसमोर ‘फ्लॅश दुष्काळा’चे नवे संकट




महाराष्ट्रातील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक भागांत थंडीचा जोर कमी झाला असून, दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उष्णतेचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत रात्रीच्या तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामानातील बदलांसोबतच राज्यातील शेतकऱ्यांसमोर ‘फ्लॅश दुष्काळा’चे नवे आव्हान उभे राहत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान; कोणताही अलर्ट नाही कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे, उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. या भागात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पुढील दिवशी किमान तापमानात सुमारे 1 अंशाने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नसल्याने दिवसा उष्णता आणि दमटपणा कायम राहू शकतो. त्यामुळे कोकणातील नागरिकांना सध्या थंडीपेक्षा उकाड्याचा अधिक अनुभव येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात रात्री गारवा, दिवसा उष्णता धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वेगवेगळे बदल नोंदवले जात आहेत. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पुढील दिवशी किमान तापमानात आणखी घट होऊन पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी थंडीचा गारवा जाणवू शकतो. मात्र, दुपारच्या वेळी तापमान वाढल्याने उष्ण हवामानाचा अनुभव येईल. काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात थंडीचा जोर कमी; तापमानात चढ-उतार कायम राज्यात सध्या थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. विशेषतः दुपारच्या तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना संमिश्र हवामानाचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नसली, तरी काही भागांमध्ये किमान तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे सकाळी आणि रात्री गारवा, तर दुपारी उष्णता असे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. तापमानातील या बदलांचा परिणाम नागरिकांसह शेतीवरही होऊ शकतो. शेतकऱ्यांसमोर ‘फ्लॅश दुष्काळा’चे नवे संकट दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दुष्काळापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा ‘फ्लॅश दुष्काळ’ अधिक वेगाने विकसित होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दुष्काळ म्हटले की अनेक दिवस किंवा महिने पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलावा कमी होणे, पिके सुकणे आणि पाणीटंचाई निर्माण होणे असे चित्र समोर येते. मात्र, फ्लॅश दुष्काळामध्ये अवघ्या काही आठवड्यांत जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊन जमीन कोरडी पडते. भोपाळ येथील मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली आणि सोलापूर या अर्ध-कोरड्या जिल्ह्यांमध्ये फ्लॅश दुष्काळाची तीव्रता आणि वेग अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसमोर हे नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. 44 वर्षांच्या अभ्यासातून महत्त्वाचे निष्कर्ष मौलाना आझाद राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील विकास पूनिया आणि दीपिका यादव यांनी 1981 ते 2024 या 44 वर्षांच्या कालावधीतील महाराष्ट्राच्या हवामानाचा अभ्यास केला. राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमधील पाऊस, तापमान, मातीतील ओलावा आणि बाष्पीभवन यासंबंधीच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. हा संशोधन अभ्यास ‘फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ द अर्थ’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात अलीकडेच प्रकाशित झाला आहे. या अभ्यासातून महाराष्ट्रातील दुष्काळाचे स्वरूप, त्याचा वेग आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जमिनीतील ओलाव्यावर होणारा परिणाम याबाबत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. संशोधनानुसार, महाराष्ट्रातील सुमारे 83 टक्के जमीन अर्ध-कोरड्या स्वरूपाची आहे. तसेच राज्याच्या एकूण वार्षिक पावसापैकी तब्बल 88 टक्के पाऊस केवळ चार महिन्यांच्या पावसाळी कालावधीत पडतो. त्यामुळे उर्वरित काळात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान ठरते. पावसाळ्याबाहेरील काळात फ्लॅश दुष्काळाच्या अधिक घटना या अभ्यासात पावसाळा आणि पावसाळ्याव्यतिरिक्त काळातील फ्लॅश दुष्काळाच्या घटनांची तुलना करण्यात आली. पावसाळ्यात नियमित पाऊस पडत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. त्यामुळे या काळात फ्लॅश दुष्काळाच्या घटना तुलनेने कमी आढळतात. 44 वर्षांच्या अभ्यासकाळात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात अशा दोनपेक्षा कमी घटना नोंदवण्यात आल्या. मात्र, पावसाळ्याव्यतिरिक्त काळात परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून आले. या काळात जिल्ह्यांमध्ये सरासरी सुमारे 20 फ्लॅश दुष्काळाच्या घटना आढळल्या. सोलापूर, धाराशिव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तर अशा 25 पेक्षा अधिक घटना नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ पावसाचे प्रमाणच नव्हे, तर पावसाळ्यानंतर जमिनीतील ओलावा किती वेगाने कमी होतो, यावरही दुष्काळाची तीव्रता अवलंबून असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यापूर्वीचा काळ सर्वाधिक धोकादायक संशोधनातील आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीचे काही आठवडे सर्वाधिक संवेदनशील ठरतात. या काळात तापमान वाढलेले असते. त्याचबरोबर हवेतील कोरडेपणा आणि बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो. यामुळे राज्याच्या अनेक भागांत फ्लॅश दुष्काळाच्या घटना अधिक वारंवार घडत असल्याचे संशोधनात दिसून आले. काही ठिकाणी अशा दुष्काळाची स्थिती सलग 30 ते 40 दिवस टिकल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. फ्लॅश दुष्काळ म्हणजे नेमके काय? फ्लॅश दुष्काळ म्हणजे अत्यंत कमी कालावधीत जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होऊन निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती. पारंपरिक दुष्काळ निर्माण होण्यासाठी तुलनेने दीर्घ काळ पावसाची कमतरता असावी लागते. मात्र, फ्लॅश दुष्काळ काही आठवड्यांतच निर्माण होऊ शकतो. या प्रक्रियेत वाढते तापमान, हवेतील कोरडेपणा आणि बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण वेगाने घटते. परिणामी, जमिनीतील ओलावा कमी होऊन पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी अशी परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. आठ दिवसांत कोरडेपणाचे प्रमाण 6 ते 9 अंकांनी वाढते अभ्यासात नमूद केल्यानुसार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सांगली आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये दर आठ दिवसांनी कोरडेपणाचे प्रमाण 6 ते 9 पर्सेंटाइल अंकांनी वाढते. काही भागांत ही वाढ 9 अंकांपेक्षाही अधिक असल्याचे आढळले आहे. याउलट राज्यातील बहुतांश भागांत हा वेग 6 अंकांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. एकूणच, महाराष्ट्रातील हवामानात तापमानाचे चढ-उतार सुरू असतानाच राज्यासमोर जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होण्याचे आव्हानही उभे राहत आहे. त्यामुळे भविष्यात दुष्काळाचे नियोजन करताना केवळ पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता तापमान, बाष्पीभवन आणि जमिनीतील ओलावा यांचाही विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा… 4 दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आलेल्या आरोपीवर पुण्यात कोर्टाबाहेरच जीवघेणा हल्ला:गोळीबारानंतर कोयत्याने दोन्ही हात छाटले; सुप्रिया सुळे, वडेट्टीवारांचा गृहखात्यावर संताप अवघ्या 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या एका हत्या प्रकरणातील आरोपीवर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला झाला. 20 एप्रिल 2025 रोजी कात्रज येथील संतोषनगरमध्ये झालेल्या शुभम सुभाष चव्हाण याच्या हत्येतील मुख्य आरोपी मंदार मारुती किवळे याच्यावर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आला असता 6 ते 7 हल्लेखोरांनी सापळा रचून आधी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या रक्तरंजित थरारानंतर पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवरून राजकारण तापले असून खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणी 7 संशयित आरोपींची नावेही समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *