Headlines

महाराष्ट्र दिनी किडनी रुग्णांना मोठी भेट:राज्यात 'महाडायलिसिस' योजनेचा विस्तार, 1 मे रोजी 12 नवीन केंद्रांचे लोकार्पण




ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या “महाडायलेसिस” योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते एक मे रोजी नवीन बारा डायलिसिस केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे किडनी विकारांच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे राज्यातील किडनी विकारग्रस्त नागरिकांना मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘महाडायलिसिस’ योजना सध्या विविध सरकारी रुग्णालयांत प्रभावीपणे राबवली जात आहे. या सुविधेमुळे राज्यातील हजारो किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालयांपर्यंत ही सेवा पोहोचवून ग्रामीण भागातील रुग्णांना घराजवळच निःशुल्क उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण रुग्णालयांत किमान ५ बेड्स, तर उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांत ८ ते १० डायलिसिस बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यात ९२ महाडायलिसिस केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये ५५८ डायलिसिस बेड्स उपलब्ध आहेत. महाराष्ट्र दिनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते १२ नवीन केंद्रांचे लोकार्पण होणार असून, त्यामुळे एकूण केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार आहे. या नव्या केंद्रांमध्ये दुर्गम भागातील रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकार्पण होणाऱ्या केंद्रांमध्ये मुरगुड (जि. कोल्हापूर), मूल (जि. चंद्रपूर), दारव्हा (जि. यवतमाळ), केज (जि. बीड), इगतपुरी (जि. नाशिक), रावेर (जि. जळगाव), मंगळवेढा (जि. सोलापूर), ढेबेवाडी (जि. सातारा), वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग), कुरखेडा (जि. गडचिरोली), दापोली (जि. रत्नागिरी) आणि बदलापूर (जि. ठाणे) येथील रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णांना ऑनलाईन स्लॉट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उपचारासाठी प्रतीक्षा कालावधी कमी होणार असून या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डायलिसिस तंत्रज्ञ, नर्सेस व सहाय्यक कर्मचारी कार्यरत असून, नेफ्रोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार दिले जाणार आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन केले जात आहे. तसेच रक्त तपासणी, आवश्यक इंजेक्शन आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला यांसारख्या सेवा रुग्णांना पूर्णतः मोफत दिल्या जाणार आहेत. ही योजना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत एचएलएल लाइफकेअर लिमिटेड या संस्थेमार्फत राबवली जात असून, सर्व केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे. ‘महाडायलिसिस’ योजनेमुळे खासगी उपचारांवरील आर्थिक भार कमी होऊन सरकारी रुग्णालयांतच दर्जेदार व मोफत सेवा उपलब्ध झाल्याने राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *