Headlines

महावितरणचे दुर्लक्ष:खुल्लोडमध्ये झुकलेले खांब, दुरवस्था झालेल्या डीपीमुळे जीवाला धोका, अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप, दुरुस्ती करण्याची केली मागणी‎




खुल्लोड येथील गट क्रमांक २४ मधील शेतात जुनी असलेली वीज वितरण डीपी तसेच मुख्य वीज वाहिनीचे खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत झुकलेले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. येथील शेतकरी अॅड अभिषेक नागेश खुल्लोडकर यांच्या शेतात डीपी तसेच मुख्य वीज वाहिनीचे खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत झुकलेले असून डीपी वरील फ्यूज उघडे पडलेले असून विद्युत केबल जमिनीला टेकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः शेतातील मशागतीची कामे, ट्रॅक्टरची ये-जा आणि शेतीची इतर कामे करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येबाबत शेतकरी खुल्लोडकर यांनी महावितरणकडे लेखी निवेदन देऊन डीपी व खांब तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, निवेदनानंतरही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पावसाळ्यात वादळी वारे व मुसळधार पावसामुळे झुकलेले खांब कोसळण्याची तसेच विद्युत तारा तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी , जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला . धोकादायक डीपी ची दुरुस्ती करावी -महावितरण प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने पाहणी करून झुकलेले खांब सरळ करावेत, धोकादायक डीपी ची दुरुस्ती करावी व उघड्या विद्युत यंत्रणेची सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *