![]()
अमरावती येथे महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाने स्मार्ट मीटर सक्ती आणि अवाजवी वीज बिलांविरोधात तीव्र आंदोलन केले. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळील महावितरण कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मेळाव्याच्या पेंडालमध्ये ठेवलेली पत्रके आणि लॅपटॉप फेकून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या मते, वाढीव आणि अवाजवी वीज बिलांमुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. ही लूट थांबवावी आणि सक्तीने लावले जाणारे स्मार्ट मीटर तत्काळ रद्द करावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. महावितरणकडून सध्या अमरावती आणि परिसरात वीज ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठवून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे. अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना अवघ्या दोन खोल्यांच्या घरासाठी चार ते पाच हजार रुपयांपर्यंत बिल येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. नवीन स्मार्ट मीटर अत्यंत वेगाने फिरत असून, त्यामुळे बिलांची रक्कम दुप्पट-तिप्पट येत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. प्रहारचे अमरावती जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले की, “सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट असताना महावितरणकडून सक्तीने स्मार्ट मीटर लावून त्यांची उघड लूट केली जात आहे.” ठाकरे यांनी इशारा दिला की, जर महावितरणने ही मीटर सक्ती मागे घेतली नाही आणि वीज बिलांमधील त्रुटी दूर केल्या नाहीत, तर संपूर्ण जिल्ह्यात याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले आहेत, ते मीटर काढून महावितरणच्या कार्यालयाबाहेर आणून फेकण्यात येतील. या आंदोलनात प्रहारच्या विविध जनसंघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदनात वीज ग्राहकांना आलेली चुकीची आणि वाढीव वीज बिले तात्काळ दुरुस्त करण्याची, नवीन ‘स्मार्ट मीटर’ची सक्ती तातडीने थांबवण्याची आणि ज्या ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवून वाढीव बिले येत आहेत, त्यांचे नवे मीटर काढून त्या जागी जुनेच मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.
Source link
महावितरणच्या ग्राहक मेळाव्यात 'प्रहार'चे स्मार्ट मीटर विरोधात तीव्र आंदोलन:लॅपटॉप फेकून, पत्रके उडवून सक्ती रद्द करण्याची मागणी