Headlines

महिलांची फसवणूक करणारी टोळी 12 तासांत जेरबंद:5 आरोपी अटक, 5.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; बनावट सोन्याच्या बिस्किटांचा सापळा उधळला‎




महिलांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची चार बिस्किटे, एक कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अहमदपूर शहरातील महिलांना लक्ष्य करत होते. “१० ग्रॅम सोन्याचे बिस्किट देतो, त्याबदल्यात तुमचे सोन्याचे दागिने द्या,” असे आमिष दाखवून ते महिलांचा विश्वास संपादन करत. त्यानंतर खोटे सोन्याचे बिस्किट देऊन महिलांच्या गळ्यातील व अंगावरील दागिने घेऊन पसार होत होते. या प्रकारात फसवणूक झालेल्या दोन महिलांनी अहमदपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. आरोपींकडून सुमारे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र, बनावट सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीनिवास राठोड, पोलिस अंमलदार तानाजी आरदवाड, हरिदास कांबळवाड, दत्ता इंद्राळे, विशाल सारोळे, गणेश चव्हाण आणि राष्ट्रपाल कांबळे यांच्या पथकाने कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *