Headlines

माजी सैनिकांच्या अतिक्रमित घरांवर नगरपरिषदेचा 'गजराज':दर्यापूरमध्ये रस्ता रुंदीकरणावरून तणाव, सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचा ठिय्या




दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासनाने माजी सैनिकांच्या अतिक्रमित रहिवासी घरांवर ‘गजराज’ चालवला. या कारवाईमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयराव चौरपगार आणि भारतीय पूर्व सैनिक संस्थेचे अध्यक्ष मनोहर सरदार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धडक दिली. त्यांनी मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन करत प्रश्नांचा भडीमार केला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईमुळे अनेक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेच्या या कृतीमुळे कुटुंबांवर संकट कोसळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सैनिक पत्नी बेबी वाकपांजर यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत घरे न पाडण्याची विनंती केली, ज्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले. आंदोलकांनी घर न पाडण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. अखेर, मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी अतिक्रमणधारक आणि माजी सैनिक यांची घरे पाडली जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी साहेबराव वाकपांजर, मनोज गव्हाणे, चंदू रायबोले, स्नेहल भटकर, श्रीकृष्ण नीतनवरे, बेबी वाकपांजर, बाबीता डोंगरदिवे, उषा लव्हाळे आणि सैनिक कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *