![]()
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी पुणे पुस्तक महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ केला. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची असल्याचे त्यांनी सांगितले.
.
घरात वाचनाचे संस्कार झाले, तर मुलांना चांगली पुस्तके वाचण्याची आणि त्यातून ज्ञान मिळवण्याची गोडी लागते, असे मिसाळ म्हणाल्या. वाचनाची आवड पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १२ ते २० डिसेंबरदरम्यान पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे. मंडप उभारणीच्या शुभारंभावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, लोकमान्य मल्टिपर्पजचे सुशील जाधव, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, संयोजन समितीच्या सदस्य बागेश्री मंठाळकर आणि प्रसेनजीत फडणवीस उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या की, पुणे पुस्तक महोत्सव सुरू करण्याची संकल्पना पुढे आली, तेव्हा तो यशस्वी होईल का, याबाबत सुरुवातीला शंका होती. मात्र, पुणेकरांच्या प्रतिसादामुळे महोत्सवाचा विस्तार दरवर्षी होत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे वाचन चळवळीला बळ मिळत आहे.
एका सर्वेक्षणानुसार मुलांचा स्क्रीन टाइम कमी होत असल्याचे समोर आले आहे, असेही त्या म्हणाल्या. पुस्तके ज्ञान देतात आणि एखादे पुस्तक शेवटपर्यंत वाचण्याची उत्सुकता निर्माण होते, असा स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला. महोत्सवात तरुणांची मोठी गर्दी होते आणि अनेक दुर्मिळ पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात, असेही त्यांनी नमूद केले.
‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमात ८ डिसेंबरला सहभागी होऊन एक तास वाचनासाठी द्यावा, असे आवाहन मिसाळ यांनी केले.
राजेश पांडे म्हणाले की, यंदा महोत्सवातील २०० दालने प्रतीक्षायादीवर आहेत. महोत्सवाचे नियोजन सुरू असून, विविध विषयांवरील २४ सत्रे आयोजित केली आहेत. लिट फेस्ट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत अनेक नामांकित मान्यवर सहभागी होणार आहेत. पुणेकरांचा महोत्सव म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता राष्ट्रीय स्तरावरील महोत्सव झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम ८ डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत होणार आहे. त्यात पाच लाख पुणेकर एकाच वेळी वाचन करणार आहेत. पुणेकरांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पांडे यांनी केले. बागेश्री मंठाळकर यांनी आभार मानले.