![]()
मानवेढे गावात महिनाभरापासून विजेच्या लपंडाव सुरू आहे. त्यात ८ दिवसांपासून विजच नसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी महिलांसह लहान मुलांना घेऊन थेट इगतपुरी तहसील कार्यालयात धाव घेतली. ग्रामस्थ तहसील कार्यालयात आल्याची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी माळी दाखल झाले. संतप्त महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना घेराव घालत वीज पुरवठा सुरळीत का होत नाही, याचा जाब विचारला. अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने ग्रामस्थांचा रोष आणखी वाढला आणि त्यांनी तहसीलदारांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, तहसील कार्यालयात आमदार हिरामण खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. आंदोलनाची माहिती मिळताच आमदारांनी ग्रामस्थांना बोलावून अडचणी जाणून घेतल्या. आमदारांनी महावितरणचे अधिकारी माळी यांना आवश्यक निधी मंजूर करून देतो, मात्र वीज समस्येचे काम तात्काळ हाती घेऊन गावाचा वीज पुरवठा पूर्ववत करा, असे निर्देश त्यांनी दिले. आंदोलनात भाऊराव भागडे, बाळासाहेब धुमाळ, मनोज भागडे, खंडू भागडे, धोंडीराम भागडे, कुनाल पंडित आदी ग्रामस्थ सहभागी होते. आमदारांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले असले तरी लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Source link
मानवेढेत आठ दिवसांपासून वीज नाही, ग्रामस्थांचा ठिय्या:महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव