Headlines

मानसिक आजारावरील स्वानुभव कथांच्या पुस्तकाचे प्रकाशन:'वादळ पेललेले नाविक' मधून शुभंकर-शुभार्थींचा प्रवास व्यक्त; डॉ. शिरीषा साठे यांचे प्रतिपादन




मनोविकारांकडून एका सजग सर्वसामान्य व्यक्तीत्त्वाकडे झालेला शुभंकर आणि शुभार्थींचा प्रवास वादळ पेललेले नाविक या पुस्तकातून प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. मनोरुग्णांकडे पाहण्याची पूर्वग्रहदूषित दृष्टी समाज म्हणून वावरताना बदलण्याची निकड आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे यांनी रविवारी येथे केले. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आलेल्या वादळ पेललेले नाविक (मनोरुग्णांची काळजी घेणाऱ्यांच्या स्वानुभवकथा) आणि या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ‘द रेसिलियंट कॅप्टन्स’ या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. निश्चोल रावळ, फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल वर्तक, उपाध्यक्ष तसेच पुस्तकाचे संकलन व शब्दांकन करणाऱ्या प्राची बर्वे, प्राज फाउंडेशनच्या सीएसआर विभागाच्या प्रतिनिधी बागेश्री आडकर, संस्थेच्या सचिव स्मिता गोडसे व खजिनदार मंजिरी चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसशास्त्रज्ञ डॉ. सुजला वाटवे, ‘सा’ चे माजी अध्यक्ष अमृत बक्षी, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे कन्सल्टंट डॉ. सचिन गणोरकर आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. डाॅ. साठे यांनी मनोरुग्ण व्यक्तींइतकाच त्याच्या कुटुंबीयांचा विचार अगत्याचा असल्याचे सांगितले. मानसिक आजारांच्या बाबतीत ब्लेम आणि शेम, असे दोन शत्रू आपल्या मनात वावरत असतात कारण समाज म्हणून आपण अजूनही पूर्वग्रहदूषित नजरेचे आहोत. वैज्ञानिक दृष्टीने आपण मनोरुग्णांकडे कधी बघणार, असा प्रश्न त्यांनी विचारला. मनोविकारांच्या बाबतीत आता शारीरिक आणि मानसिक, पातळीवर अतिशय प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत, पण कोविडकाळात प्रचलीत झालेली न्यू नॉर्मल ही संज्ञा आपण बरे झालेल्या मनोरुग्णांच्या संदर्भात मोकळेपणाने कधी अंगिकारणार, हा प्रश्न आहे. कुणा एकाचा हा दोष नसून, समाजघटक म्हणून आपल्या सामाजिक जबाबदारीचे वर्तुळ आपण पूर्ण केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. डाॅ. निश्चोल रावळ यांनी मनोरुग्ण उपचारांनी बरा झाल्यावर काय फरक घडून येतो, त्यांचे व कुटुंबीयांचे संघर्ष कोणती आव्हाने पेलतात, याचे स्वानुभव मांडणारे हे पुस्तक प्रत्येकाला प्रेरक वाटेल, असे मत मांडले. बरे झालेले रुग्ण एक व्यक्ती म्हणून समाजात अधिक समृद्ध अशी वाटचाल करतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. प्राची बर्वे यांनी या स्वानुभवकथा शब्दांकित व संकलित करतानाच्या भावना मांडल्या. मानसिक आजार हा एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. तो कुटुंबीय, नातेवाईक, स्नेही आणि वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक अशा अनेकांचा एकत्रित प्रवास असतो, याचा प्रत्यय या स्वानुभवकथांमुळे आला, असे त्या म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *