Headlines

मुंबईत पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे विरुद्ध जैन मुनी आमनेसामने:आमच्या नादाला लागू नका; संदीप देशपांडेंचा जैन धर्मगुरू निलेशचंद्रांना थेट इशारा




घाटकोपर आणि दादरनंतर आता चर्नी रोड परिसरातही जैन धर्मीयांकडून रस्त्यांवर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांमुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जैन धर्मगुरूंमध्ये थेट शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. “तुम्ही मासे खाऊ नका म्हणून इतरांना भाग पाडणे आणि सार्वजनिक रस्ते रंगवणे हा ‘सांस्कृतिक दहशतवाद’ आहे,” अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसेच, “व्यापाऱ्यांना हिशोब समजतो, मात्र ते शिकलेले नसतात; आमच्या नादाला लागू नका,” असा थेट इशाराही त्यांनी जैन मुनींना दिला आहे. चातुर्मास किंवा धार्मिक कारणास्तव जैन समुदायाकडून मुंबईतील विविध सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या आहेत. दादरमध्ये थेट मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेरही अशा पट्ट्या मारण्यात आल्यानंतर मनसे सैनिकांनी काल तीव्र आंदोलन केले. वाद वाढल्याचे पाहून मुंबई महानगरपालिकेने मध्यस्थी करत या पट्ट्या तातडीने पुसून टाकल्या. “सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे रंगरंगोटी करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी पालिकेने दिलेली नाही,” असे स्पष्टीकरण बीएमसीने दिले आहे. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत; जैन मुनींचे आव्हान मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी मनसेला थेट डिवचले होते. “पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे. आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नाहीत. मनसेला आंदोलन करायचे असेल तर त्यांनी मुंब्र्यात जाऊन करावे,” असे आव्हान त्यांनी दिले होते. संदीप देशपांडेंचा पलटवार – हा तर सांस्कृतिक दहशतवाद! जैन मुनींच्या या विधानावर आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला. “ते कोणतेतरी चंद्रावर राहणारे निलेशचंद्र मुनी बोलले की ‘आम्ही बांगड्या भरल्या नाहीत.’ या वाक्यातून त्यांची महिलांबद्दलची संकुचित मानसिकता दिसून येते. आमच्याकडे अहिल्याबाई होळकर आणि झाशीच्या राणीसारख्या वीर महिलांचा इतिहास आहे, त्यांच्याकडे नाही,” असे संदीप देशपांडे म्हणालेत. मुंब्र्यात पांढरी पट्टी मारून दाखवा “आम्हाला कुठे आंदोलन करायचे हे जैन मुनींनी शिकवू नये. मुंबईत दादरमध्ये पट्ट्या मारल्या, तशी तुमच्यात हिंमत असेल तर मुंब्रामध्ये सफेद पट्टी मारून दाखवा, मग आम्ही पाहू,” असे आव्हान संदीप देशपांडे यांनी जैन मुनींना दिले. भोंग्यांप्रमाणेच विरोध करणार “आमची भोंग्यांच्या बाबतीत जी भूमिका होती, तीच या पांढऱ्या पट्ट्यांच्या बाबतीत आहे. ‘माझ्या घरासमोर मच्छी मार्केट नको, मी मासे खात नाही म्हणून तुम्हीही खाऊ नका’ हा सांस्कृतिक दहशतवाद झाला. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालून रोगराई पसरवणे हाही एक प्रकारचा दहशतवाद आहे. आम्ही याला खतपाणी घालू देणार नाही,” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. कायदा सर्वांसाठी समान “जैन समाजात एकही समाजसुधारक झाला नाही, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाला पुढे नेले. कायदा सांगतो की रस्ता ही सार्वजनिक मालमत्ता आहे. तिथे काहीही केले तर दंडात्मक कारवाईचे नियम आहेत. कायदा आणि नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही. मला शंका आहे की हे निलेशचंद्र नेमके कोणत्या शाळेत शिकलेत? व्यापाऱ्यांना पैशांचा हिशोब समजतो, पण ते सुशिक्षित नसतात. मुंबईत जिथे जिथे असे प्रकार घडतील, तिथे मनसैनिक पोहोचतील आणि पट्ट्या पुसून टाकतील,” असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *