![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चितळे बंधूंनी जागतिक ब्रँड बनण्याचा आत्मविश्वास दाखवला असून, राज्यातील खाद्य उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि केदार चितळे आदी मान्यवर उपस्थित होते. व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगात आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. चितळे बंधूंची दूरदृष्टी या प्रकल्पातून दिसून येते, असे ते म्हणाले. या पार्कमध्ये स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप नसलेली उच्च दर्जाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. परदेशी यंत्रांमध्ये आवश्यक बदल करून ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पात नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेली निरीक्षण गॅलरी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गॅलरीमुळे उद्योगात पारदर्शकता येते आणि गुणवत्तेची तपासणी करणेही शक्य होते. येथून उत्पादनाच्या विविध टप्प्यांवरील प्रक्रियांचे अवलोकन करता येते. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि वितरकांना परदेशाप्रमाणे औद्योगिक सहलीच्या माध्यमातून व्हिजन पार्कमधील अनुभव घेता येईल. महाराष्ट्रीयन उद्योगाने अशा जागतिक मानकांचे पालन करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अन्न ही एक ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. चायनीज, जपानी, फ्रेंच, कोरियन खाद्यपदार्थांचा आस्वाद जगभरातील लोक घेतात. भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आढळते, जी दर १० किलोमीटरवर बदलते. यात अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ आहेत. या पारंपरिक पदार्थांना जागतिक ब्रँडच्या रूपात जगासमोर आणण्याचे आणि त्यासाठी आवश्यक मानकांचे पालन करण्याचे काम चितळे बंधूंनी केले आहे. त्यांनी स्नॅकिंगचे उत्तम ब्रँड्स तयार केले आहेत. परदेशी नागरिक आता भारतीय पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. चितळे यांचे महाराष्ट्रीयन पदार्थही अशाच प्रकारे जगात पोहोचतील आणि लोकप्रिय होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘एक्सपोर्ट ओरिएंटेड’ फूड इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. चार पिढ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चितळे हा एक जागतिक ब्रँड बनला असून, त्यांची ओळख ३५ देशांमध्ये पोहोचली आहे. पुणेकरांनी चितळे यांच्या उत्पादनांवर नेहमीच मनापासून प्रेम केले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
Source link
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चितळे व्हिजन पार्कचे उद्घाटन:निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सहकार्य करेल – देवेंद्र फडणवीस