Headlines

मूर्तिजापूरात महाराजस्व शिबिर; 820 जणांना प्रमाणपत्रांचे वितरण:नागरिकांना फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती सेवा‎




शासनाच्या निर्णयानूसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी १ ऑगस्ट रोजी कोकणवाडी भागात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८२० नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार हरीश पिंपळे व इतर मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी अपार यांच्या मार्गदर्शनात आयोजित शिबिरास तहसीलदार शिल्पा बोबडे, तहसीलदार रवींद्र कापशीकर, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे, गटविकास अधिकारी बार्शिटाकळी पवार, तालुका कृषी अधिकारी दिपक तायडे, मुख्याधिकारी निलेश जाधव, मुख्याधिकारी नगरपंचायत राहुल कंकाळ, तसेच उपविभागामधील विविध विभागांचे विभागप्रमुख, तहसील कार्यालय मूर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. महाराजस्व अभियानाच्या कालावधीत एकूण ११,८४६ प्रकरणांवर महसूल प्रशासनाने कारवाई केल्याचे सांगण्यात आले. समाधान शिबिरात विधानसभा क्षेत्रातील जवळपास १५०० नागरिक उपस्थित होते. शिबिरात एकूण १०७ तक्रारी व निवेदने प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींचे नियमानुसार तातडीने परीक्षण करून त्यांचे वेळेत निराकरण करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी मूर्तिजापूर व बार्शिटाकळी तालुक्यातील महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांनी उत्कृष्ट समन्वय साधून परिश्रम घेतले. नागरिकांना लाभांचे केले वितरण ः शिबिरामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थसहाय्य, संजय गांधी योजनेंतर्गत लाभांचे वितरण, तसेच कूळ जमिनी संदर्भातील वर्ग-२ ते वर्ग-१ अशी प्रकरणे निकाली काढण्यात आली. याशिवाय, फेरफार प्रकरणे निकाली काढणे ७/ १२ दुरुस्ती, डिजिटल ७/ १२ उतारे आणि आठ-अ उतारे वितरित करण्यात आले. सेतू केंद्रामार्फत विविध दाखले असे एकूण ८२० प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिरात विविध शासकीय विभागांचे एकूण २९ सेवा स्टॉल उभारण्यात आले. यात पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला व बाल विकास विभाग, महावितरण, भूमी अभिलेख, पंचायत विभाग, नगरपालिका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जलसंधारण विभाग, बांधकाम कामगार विभाग, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, आधार सेवा केंद्र, महिला बचत गट, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच तक्रार निवारण कक्षाचा समावेश होता. नागरिकांना डिजिटल सेवा, ई-फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती, विविध दाखले व प्रमाणपत्रे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *