Headlines

मेधा कुलकर्णी संसदेत मांडणार 'कॉर्पोरेट जिहाद' मुद्दा:कंपन्यांसाठी नियम-अटी करणार; 'लव्ह जिहाद' विरोधात अभियानास प्रारंभ




खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘कॉर्पोरेट जिहाद’चा मुद्दा आगामी संसदेत मांडणार असल्याचे सांगितले. कॉर्पोरेट आस्थापनांमध्ये वाढता जिहाद रोखण्यासाठी भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर नियम-अटी लागू करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियानाचा प्रारंभ झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, केवळ ‘कॉर्पोरेट जिहाद’च नव्हे, तर जिथे संधी मिळेल तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे आणि देशाचे लचके तोडण्याचे कारस्थान पद्धतशीरपणे चालू आहे. आपल्या तरुण पिढीच्या विचारसरणीवर आणि धर्मावर होणारे हे आक्रमण चिंताजनक आहे. यात केवळ प्रत्यक्ष गुन्हेगारांनाच नव्हे, तर त्यांना छुप्या पद्धतीने रसद पुरवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन करणे आवश्यक आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियममध्ये आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण-तरुणींनी आणि पुणेकर नागरिकांनी प्रतिसाद दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना शेफाली वैद्य यांनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ची उदाहरणे दिली. नाशिकमधील टीसीएस कंपनीप्रमाणेच पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या ‘लेन्सकार्ट’मध्ये ‘हिजाब, पगडी चालेल; मात्र कुंकू, टिळा, कलावा चालणार नाही’, असे हिंदूंशी भेदभाव करणारे नियम बनवले गेले होते. तीव्र विरोध झाल्यावर हे नियम केवळ आठ दिवसांसाठी शिथिल केले होते, असे त्यांनी सांगितले. अन्य धर्मीयांच्या प्रथा परंपरा चालतील; मात्र हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा चालणार नाहीत, ही मानसिकता शाळेपासूनच तयार होते. पुढे कॉर्पोरेट कल्चरमध्ये बहुसंख्य असूनही हिंदू मुकाट्याने अन्यायकारक बंधने स्वीकारतो आणि भेदभाव सहन करतो. अन्य धर्मीय त्यांच्या प्रथा-परंपरा पाळण्यासाठी जागृत असतात, त्याचप्रमाणे हिंदूंनीही स्वत:च्या धार्मिक अस्मितेसाठी ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या विरोधात जागृत होऊन संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन वैद्य यांनी केले. असे झाल्यास हिंदू समाज व हिंदू संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *