Headlines

मेळघाट जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ:आता 1 जुलैपासून होणार बंद, सप्टेंबरअखेरपर्यंत राहणार स्थगित




मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही सफारी १५ जूनपासून बंद होणार होती, परंतु आता तिला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आता ३० जूनपर्यंत सफारीचा लाभ घेऊ शकतील. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मेळघाटमधील जंगल सफारी आता १ जुलैपासून बंद केली जाईल. संभाव्य पावसाळा आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सफारी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पूर्णपणे बंद राहील. यामध्ये सेमाडोह, चिखलदरा, हरिसाल, शहानूर, नरनाळा, धारगड आणि वसाली या सात सफारी गेटचा समावेश आहे. दरवर्षी पावसाळ्यात जंगलातील कच्चे रस्ते खराब होतात, ज्यामुळे घसरण, नाल्यांना पूर येणे आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत जंगलात वाहने चालवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पर्यटक आणि वन्यजीव या दोघांच्याही सुरक्षिततेचा विचार करून मान्सूनच्या काळात ‘कोअर एरिया’मधील सफारी तात्पुरती थांबवली जाते. पाऊस सामान्य राहिल्यास, काही बफर झोन किंवा मर्यादित मार्ग पर्यटकांसाठी खुले ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, सतत मुसळधार पाऊस झाल्यास या भागातील सफारीदेखील पूर्णपणे बंद केली जाईल. पावसाळ्यात जंगलात वन्यजीवांचा वावर वाढतो, त्यामुळे निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणाला वन विभाग नेहमीच प्राधान्य देतो. वन विभागाने पर्यटकांना कोणतीही सफारी बुकिंग करण्यापूर्वी संबंधित अभयारण्याची अधिकृत आणि ताजी माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विदर्भातील इतर चार प्रमुख अभयारण्ये – टीपेश्वर, ज्ञानगंगा, काटेपूर्णा आणि पैनगंगा – हीसुद्धा पावसाच्या स्थितीनुसार पर्यटकांसाठी बंद केली जाणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *