Headlines

यवतमाळचा आंतरजिल्हा चोरटा वाठोडा पोलिसांच्या जाळ्यात:सोने-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल हस्तगत, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता




वाठोडा पोलिसांनी मध्यरात्री एका घरफोडीचा प्रयत्न हाणून पाडला. ‘नाकाबंदी ॲप’च्या मदतीने त्यांनी एका सराईत आंतरजिल्हा चोरट्याला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. सुशांत अशोक थूल (वय 30, रा. शिवाजी नगर, राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना काल रात्री वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंदसागर लॉन, माँ चंडिका नगर भागात घडली. बीट मार्शल पोलिस शिपाई संजू ठाकरे आणि शशिकांत पटोले हे गस्त घालत असताना त्यांना एका बंद घराच्या खिडकीतून संशयास्पद हालचाल दिसली.पोलिसांनी घराचे मुख्य गेट बाहेरून कुलूपबंद पाहिले, मात्र आतील मुख्य दरवाजाचे लॉक तुटलेले आढळले. घरात कोणीतरी अज्ञात व्यक्ती असल्याची खात्री पटताच त्यांनी तातडीने रात्रपाळीचे अधिकारी पीएसआय पवार यांना घटनास्थळी बोलावले. चोर घरातच दबा धरून बसला होता. त्याला संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी घराच्या अंगणात लावलेल्या दुचाकीचा क्रमांक टिपला. ‘नाकाबंदी ॲप’च्या साहाय्याने त्या दुचाकीवरून घरमालकाचा मोबाईल क्रमांक शोधून काढण्यात आला. पोलिसांनी मध्यरात्रीच घरमालकाशी संपर्क साधला असता, ते कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याची माहिती मिळाली. घरात कोणीही नसून आतमध्ये असलेला इसम चोरच असल्याची खात्री पटली. घरमालकाकडून खात्री पटताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण घराला चारही बाजूंनी वेढा टाकला. पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून घरात लपलेला चोरटा घाबरला. पोलिसांनी घरात घुसून त्याला अटक केली आणि पोलिस ठाण्यात आणले. आरोपी सुशांत थूल याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून 1,06,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 20 हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या धातूच्या दोन पायपट्ट्या (40 ग्रॅम), 5 हजार रुपयांचे ब्रेसलेट (10 ग्रॅम), 80 हजार रुपये किमतीचा पिवळ्या धातूचा नेकलेस (20 ग्रॅम) आणि 1500 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सुशांत थूल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *