![]()
छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत आहे. शेंद्रा, बिडकीन व चिकलठाणा परिसरातील तब्बल २० हजार एकरावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग उभे राहत आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील १० ते १५ वर्षांत बदलणारे औद्योगिक स्वरूप लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन या संधींचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन उद्योजक मानसिंग पवार यांनी केले. येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘वसंतराव काळे उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना मानसिंग पवार म्हणाले, महाविद्यालय नावारूपाला आणण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाच्या त्यागाची आम्हाला जाणीव आहे. काळानुरूप बदल करत या संस्थेत तंत्रशिक्षणावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचे धडे छत्रपती शिवाजी महाविद्यालयातच मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, नाविन्यपूर्ण कल्पना आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, असे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव चंद्रकांत देशमुख, डॉ. आनंदराव महाले, बाबासाहेब मोहिते, विशाल आहेर, कौतिकराव पवार, राजू शेख, सुलतान खान, आकाश बोलधने यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक, शेतकरी आणि प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणीजनांचा केला सत्कार कार्यक्रमात कवयित्री प्रा. प्रतिभा अहिरे, प्रा. शिवाजी हुसे व प्रा. उदय डोंगरे यांचा विशेष गौरव करण्यात आला. महाविद्यालयाला मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय त्यांनी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना दिले.
Source link
युवकांनी छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिकरणाचा लाभ घ्यावा- पवार:शिवाजी महाविद्यालयात रंगला विशेष संवाद कार्यक्रम