Headlines

रत्नागिरीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक:11 शाळकरी विद्यार्थी आणि चालक जखमी, ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज




रत्नागिरी तालुक्यातील शीळ गावाजवळ गुरुवारी सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 11 शाळकरी विद्यार्थी आणि एका एसटी बसचा चालक जखमी झाला असून सर्व जखमींवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ब्रेक निकामी झाल्याने अपघात? हा अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडला. प्राथमिक माहितीनुसार, दांडेआडम येथून रत्नागिरीकडे येणाऱ्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या एसटी बसवर ती जाऊन धडकली. अपघातग्रस्त बस ही दांडेआडम येथून रत्नागिरीकडे येत होती, तर दुसरी बस रत्नागिरी आगारातून भावेआडमच्या दिशेने जात होती. शीळ गावाजवळ दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये घबराट दांडेआडमहून येणाऱ्या बसमध्ये सकाळी शाळेसाठी निघालेले अनेक विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातानंतर बसमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत विद्यार्थ्यांना आणि अन्य प्रवाशांना बाहेर काढले. या दुर्घटनेत 11 विद्यार्थी आणि बस चालक जखमी झाले. काही विद्यार्थ्यांच्या तोंडाला, दातांना आणि हनुवटीला किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सर्वांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक उपचार सुरू केले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याने काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर इतरांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली. पोलिस आणि एसटी प्रशासन घटनास्थळी अपघाताची माहिती मिळताच पोलिस, एसटी प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासोबतच दोन्ही बस बाजूला करण्याचे काम करण्यात आले. तांत्रिक तपास सुरू या अपघातामागे नेमके कारण काय, बसचे ब्रेक खरोखरच निकामी झाले होते का, तसेच दोन्ही वाहनांचा वेग किती होता, याचा तपास पोलिस आणि एसटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. संबंधित बसची तांत्रिक तपासणी करून अपघाताचे नेमके कारण शोधले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अपघातात मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, एसटी बसच्या तांत्रिक तपासणीबाबत आणि देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *