Headlines

राज्यातील दुर्मिळ हस्तलिखितांना मिळणार आता 'डिजिटल' संरक्षण:कलिना येथे उभारणार स्वतंत्र विभाग, ग्रंथालय संचालनालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय




राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या पिढीला आपल्या समृद्ध ग्रंथसंस्कृतीशी जोडण्याच्या उद्देशाने, ग्रंथालय संचालनालयात हस्तलिखित सल्लागार समितीची पहिली बैठक नुकतीच ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मोडी लिपी व देवनागरी तज्ज्ञ पद्मश्री अच्युत पालव, संस्कृती संग्रहालय संशोधन व अभ्यास केंद्राच्या संचालिका तेजस्विनी पाठक, प्रा. अभिजित दांडेकर, राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या प्र. ग्रंथपाल शालिनी इंगोले आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे उपस्थित होते. सर्व सदस्यांचे ‘भारताचे संविधान’ भेट देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीत ग्रंथालय संचालनालयाकडील सर्व हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ राज्याचे शिखर ग्रंथालय असलेल्या ‘राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, मुंबई’कडे हस्तांतरित करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच, कलिना येथील नव्या इमारतीत या साहित्यासाठी एक स्वतंत्र आणि सुसज्ज विभाग उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. ‘जनरेशन झेड’ला ग्रंथसंस्कृतीशी जोडणार ग्रंथालय संचालनालयाच्या विविध कार्यक्रमांमध्ये दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि माहितीपर फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्याची महत्त्वपूर्ण सूचना तेजस्विनी पाठक यांनी या बैठकीत केली. विशेषतः आजच्या ‘जनरेशन झेड’ म्हणजेच नव्या पिढीतील तरुणांचा यात सहभाग वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. या माध्यमातून दुर्मिळ साहित्य आणि ऐतिहासिक हस्तलिखितांचा व्यापक प्रचार-प्रसार करून तरुणांमध्ये वाचनाची आणि इतिहासाची आवड निर्माण करणे शक्य होणार आहे. शास्त्रोक्त वर्गीकरण आणि नामवंत संस्थांचे सहकार्य पद्मश्री अच्युत पालव यांनी हस्तलिखितांचे शास्त्रोक्त वर्गीकरण करून त्यांची निवड करणे आणि आकर्षक स्वरूपात प्रकाशन करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्याची सूचना मांडली. तसेच, दुर्मिळ साहित्याच्या प्रभावी संवर्धनासाठी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि मुंबईतील एशियाटिक सोसायटी यांसारख्या नामांकित संस्थांचे सहकार्य घेण्याचा प्रस्ताव प्रा. अभिजित दांडेकर यांनी दिला. याचबरोबर, मुलुंड येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या उपकेंद्रातील दुर्मिळ ग्रंथांची यादी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. साहित्यिक वारशाच्या संवर्धनाला मिळणार नवी गती उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी हस्तलिखित सल्लागार समिती कार्यान्वित केल्याबद्दल सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या विशेष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्मिळ साहित्यिक वारशाचे केवळ संशोधन आणि जतनच होणार नाही, तर डिजिटल स्वरूपात साठवणूक करण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी हा ठेवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *