Headlines

अखेर गडचिरोली प्रशासन जागे:सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमावली जारी




गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे परिपत्रक जारी केले आहे. ही दुःखद घटना 10 ऑगस्ट रोजी घडली. यात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक व सर्पमित्र अमोद विठ्ठलराव गौरकर यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र लिहून वसतिगृहांमध्ये सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली होती. याची दखल घेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूरच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी तातडीने नियमावली जारी केली. परिपत्रकानुसार, शाळा व वसतिगृह परिसरातील वाढलेले गवत, झाडेझुडपे आणि कचरा नियमित साफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच खोल्यांमधील भेगा व बिळे बुजवणे, दरवाजे-खिडक्यांची दुरुस्ती करणे आणि रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवणे बंधनकारक केले आहे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी टॉर्चचा वापर करण्यास सांगितले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांनी जमिनीवर न झोपता खाट किंवा कॉटचा वापर करावा, तसेच कपडे अथवा शूज वापरण्यापूर्वी ते झाडून पाहावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्पदंश झाल्यास रुग्णाला शांत ठेवून तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शाळा व वसतिगृह प्रमुखांना या उपाययोजनांचा अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले असून, नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, तीन निष्पाप मुलींचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला ही पावले उचलण्याची गरज का वाटली, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *