![]()
अमली पदार्थांविरोधातील लढाई तीव्र करण्यासाठी राज्यात ‘ड्रग फ्री’ अभियान राबवले जाणार आहे. यासाठी १९ विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही देश भारताची प्रगती रोखण्यासाठी पुढील पिढीला अमली पदार्थांच्या व्यसनात ढकलण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. पंजाबमध्ये पूर्वी निर्माण झालेली परिस्थिती इतर राज्यांतही निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. सिंथेटिक ड्रग्ज तयार करून तरुणांना व्यसनाधीन केले जात आहे. यातून गुन्हेगारीही वाढत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि आधुनिक पोलीस साधनसामग्रीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि योगेश कदम उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप आणि उमा खापरे यांच्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते. अमली पदार्थांची खरेदी-विक्री रोखण्याबरोबरच जनजागृतीवर भर दिला जाईल, असे फडणवीस म्हणाले. पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे. व्यसनाधीन झालेल्यांवर केवळ कारवाई न करता त्यांना योग्य उपचार देऊन व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्नही करावे लागतील. ही सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित लढाई आहे, असे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमधील वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेऊन आठ वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. आता या यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जात आहे. डायल ११२ अंतर्गत पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा प्रतिसाद देशात अव्वल असून, तीन मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याची क्षमता निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल नोंदींमुळे गुन्ह्यांचा तपास आणि दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. तपास सारथी यंत्रणेमुळे पुराव्यांची साखळी अधिक सक्षम होईल. बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, असे फडणवीस म्हणाले. पुढील १५ वर्षांत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच सुरक्षेचे नियोजन करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील आजचा दिवस सुवर्णक्षण आहे. शहराची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक साधनसामग्री दिली जात आहे. शहराच्या विकासात अजित पवार यांचे मोठे योगदान असून, आज त्यांची प्रकर्षाने आठवण येत आहे. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. पोलिसांच्या निवासस्थानांसाठीही कालबद्ध कार्यक्रम राबवला जात आहे.
Source link
राज्यात अमली पदार्थांविरोधात 19 विभाग एकत्र:ड्रग फ्री अभियानातून विक्री रोखण्यासह जनजागृतीवर भर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती