Headlines

महिलांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटणारी परजिल्ह्यातील टोळी जेरबंद:म्हसवड पोलिसांकडून सहा जबरी चोरीचे गुन्हे उघड; 8.50 लाखांचा मुद्देमाल जप्त




रानात मेंढ्या चारणाऱ्या तसेच शेतात एकट्याने काम करणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून पसार व्हायचे, अशा पद्धतीने दहशत निर्माण करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, म्हसवड आणि अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी ३६ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईल असा सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरताव आणि भाटकी परिसरात रानात मेंढ्या चारणाऱ्या तसेच शेतात काम करणाऱ्या महिलांना एकटे गाठून त्यांच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या होत्या. महिलांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्यात आले होते. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल झाले होते. या घटनांमध्ये २६ ग्रॅम वजनाचे आणि सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. एकाच पद्धतीने घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दरम्यान, आरोपींच्या हालचालींचे अवघ्या दोन सेकंदांचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले. या व्हिडिओच्या आधारे तपासाची दिशा निश्चित झाली; मात्र त्यामध्ये दिसणाऱ्या मोटारसायकलचा क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी विशेष पथक स्थापन केले. पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा माग काढत इरफान उर्फ सोन्या नजीर मुलाणी (वय २३) आणि विजय उर्फ भैय्या सतीश जाधव (वय २२, दोघेही रा. खोरोची, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनी महिलांना मारहाण करून सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली. तसेच अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचीही कबुली दिली. आरोपींकडून एकूण ३६ ग्रॅम वजनाचे, सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. गुन्ह्यांत वापरलेल्या दोन मोटारसायकली आणि दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत साडेआठ लाख रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे करीत आहेत. महिलांना एकटे गाठून दागिने लुटण्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *