Headlines

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात दोषींना शिक्षा व्हावी:डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी; CM देवेंद्र फडणवीस आणि DCM एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा




पुण्यातील मुकुंदनगर परिसरात पायल अक्षय झांबरे यांचा मृत्यू झाला. मुलगी झाल्यामुळे त्यांचा मानसिक छळ केल्याचा, हुंडा आणि मालमत्तेसाठी दबाव आणल्याचा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधानपरिषद सदस्या आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. पायल यांच्या मृत्यूप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ अंतर्गत कारवाई सुरू असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. पायल यांना मुलगी झाल्यामुळे अपमानास्पद वागणूक दिली जात होती आणि जमीन नावावर करून देण्यासाठी दबाव आणला जात होता, असे आरोप आहेत. ‘जमीन नावावर करून दे, अन्यथा आत्महत्या कर’ अशा धमक्या दिल्याचा आरोपही समोर आला आहे. या सर्व बाबींची चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. मेट्रोच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पायल प्रकरणाची माहिती दिल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशीही चर्चा केली. पायल यांच्या माहेरच्या कुटुंबीयांशी संवाद साधून विचारपूस केल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. नसरापूर प्रकरणाप्रमाणे या प्रकरणाचाही पाठपुरावा केला जाईल. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री आधार केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या अनिता शिंदे आणि आश्लेषा खंडागळे यांनी पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांकडून घटनेची माहिती घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी स्त्री आधार केंद्र पाठपुरावा करेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “दिवाळीसारख्या सणातही काही कुटुंबांमध्ये सुनांकडून सोने, पैसे आणि मालमत्तेची मागणी करून त्यांचा छळ केला जातो. ही बाब थांबली पाहिजे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *