![]()
ऊसदराच्या प्रश्नावरून पेटलेल्या शेतकरी आंदोलनाची झळ आता महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना बसू लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून, सलग 30 तासांपासून वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासाचे नियोजन कोलमडले असून, अन्न-पाण्याविना अडकलेल्या वाहनचालकांचा संताप अखेर रस्त्यावरच व्यक्त झाला. उसाला प्रतिटन 4 हजार 500 रुपयांची पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे महामार्गावर एक हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अवजड वाहने, खासगी मोटारी आणि प्रवासी वाहनांची मोठी कोंडी झाल्याने अनेकांना इच्छित स्थळी पोहोचणे अशक्य झाले आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या वाहतुकीतील ट्रकचालकांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक तास वाहनातून बाहेर पडता येत नसल्याने चालक आणि सहप्रवाशांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. कोंडीचे संकट, विक्रेत्यांची चांदी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रवाशांसमोर अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था किंवा मदत उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली. या परिस्थितीचा फायदा घेत काही विक्रेत्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढविल्याचा आरोप वाहनचालकांनी केला. वीस रुपयांची बाटली पन्नास रुपयांना विकली जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. वाहनचालकांचा संताप पोलिसांवर आंदोलनाचा प्रश्न मार्गी लागत नसताना प्रवाशांच्या मदतीसाठीही ठोस पावले उचलली जात नसल्याने वाहनचालकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या पोलिसांशी संतप्त वाहनचालकांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा विरोध नाही; मात्र त्यांच्या आंदोलनामुळे अडकलेल्या नागरिकांना पाणी, अन्न आणि सुरक्षिततेची सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ प्रवासी वाहनांपुरता मर्यादित राहिलेला नाही. व्यापारी मालवाहतूकही विस्कळीत झाली असून, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न आणि सामान्य प्रवाशांची होणारी परवड यांची सांगड घालत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
महामार्गावरील कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला!:30 तास वाहतूक ठप्प; हजारो प्रवासी रस्त्यावरच अडकले, पाणी-अन्नासाठी वाहनचालकांची वणवण