Headlines

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! वाघाच्या हल्ल्यात 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू:आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच वाघाने 200 मीटरपर्यंत फरफटत नेले




एकीकडे संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असताना, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात आई-वडिलांसोबत गेलेल्या 5 वर्षांच्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मोक्ष सचिन बुरडे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच वाघाने चिमुकल्याला उचलून नेले. या घटनेमुळे दोनाड गावासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, आनंदाने साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या सणावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या दोनाड गावातील शेतकरी सचिन दयाराम बुरडे (वय 45) यांची दोन एकर शेती आहे. गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांच्या शेतातील पावसाळी धानाची कापणी करण्यात आली होती. कापणी केलेल्या धानाचा पुंजना करण्यासाठी सचिन बुरडे हे पत्नी सोनाली यांच्यासोबत दुपारच्या सुमारास शेतात गेले होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे त्यांची दोन्ही मुले घरी होती. दरम्यान, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सचिन बुरडे यांचा 10 वर्षांचा मोठा मुलगा नक्षत्र आणि 5 वर्षांचा लहान मुलगा मोक्ष हे दोघेही आई-वडिलांना भेटण्यासाठी शेतात पोहोचले. शेतात आई-वडील धानाचा पुंजना करण्याच्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मोक्षवर हल्ला केला. काही कळण्याच्या आतच वाघाने चिमुकल्याला आपल्या जबड्यात पकडले आणि सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत ओढत नेले. आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच काळाचा घाला आपल्या पोटच्या गोळ्यावर वाघाने हल्ला केल्याचे पाहून सचिन बुरडे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी आरडाओरड करत वाघाच्या तावडीतून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाच्या भीतीने आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही क्षणांतच सर्व काही संपले. त्यांच्या आवाजाने परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. मात्र, तोपर्यंत वाघाने मोक्षला ठार केले होते. घटनास्थळापासून सुमारे 200 मीटर अंतरावर मोक्षचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्याच्या गळ्याला पकडल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. दिवाळीच्या आनंदात आई-वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी शेतात गेलेल्या चिमुकल्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने बुरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने मोठा भाऊ नक्षत्र याच्यावरही दुःखाचा आघात झाला असून, संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. वन विभाग आणि पोलिसांची घटनास्थळी धाव घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी लाखांदूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला कळवले. त्यानंतर वन विभागाचे पथक आणि लाखांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील भारती रामलाल नागोसे आणि सरपंच शिवदास बुरडे उपस्थित होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोक्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; आर्थिक मदतीची मागणी दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशीच वाघाच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने दोनाड गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात वाघाचा वावर असल्याने शेतात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरात वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच आपल्या चिमुकल्याला गमावलेल्या बुरडे कुटुंबाला शासनाने तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे. दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात दिव्यांची रोषणाई आणि आनंदाचे वातावरण असताना बुरडे कुटुंबाच्या आयुष्यात मात्र कायमचा अंधार पसरला आहे. अवघ्या 5 वर्षांच्या मोक्षचा अशा प्रकारे झालेला मृत्यू मन सुन्न करणारा असून, या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा…. रोहित पवारांना विकासकामांचा फोबिया झालाय का? जयकुमार गोरेंचा सवाल:म्हणाले, आंदोलन करण्याआधी आजोबांचा सल्ला घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उजनी धरण परिसरात प्रस्तावित डेटा सेंटरला विरोध करत आंदोलन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या आंदोलनावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार यांना विकासकामांचा फोबिया झाला आहे का, असा सवाल उपस्थित करत जिथे जिथे विकासकामे सुरू होतात, तिथे ते प्रसिद्धीसाठी आंदोलन करताना दिसतात, असा आरोप गोरेंनी केला. तसेच कोणत्याही आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आपले आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सल्ला घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *