Headlines

आजरा-आंबोली मार्गावर भीषण अपघात:17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दोन मित्र बचावले




परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तीन महाविद्यालयीन मित्रांवर काळाने घाला घातला. आजरा-आंबोली मार्गावर गवसे ते धनगरमोळा दरम्यान होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील झाडावर आदळून चारीत कोसळली. या दुर्घटनेत 17 वर्षीय समर्थ पांडुरंग पांगम याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र संस्कार अमित सुतार गंभीर जखमी झाला आहे. तिसरा मित्र प्रथमेश दुंडाप्पा वाजंत्री सुदैवाने बचावला. परीक्षेचा शेवट आनंदात साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मित्रांच्या सहलीचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने आजरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमका अपघात कसा घडला? मिळालेल्या माहितीनुसार, आजरा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा समर्थ पांगम हा आपल्या दोन मित्रांसोबत होंडा सिटी कारने फिरण्यासाठी बाहेर पडला होता. समर्थसोबत संस्कार सुतार आणि प्रथमेश वाजंत्री हे दोघेही होते. तिघांचाही शेवटचा पेपर झाल्याने परीक्षेचा ताण संपला होता. सुट्टीची सुरुवात मित्रांसोबत आनंदात करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार तिघेही धनगरमोळा परिसराच्या दिशेने गेले. तेथील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास ते आजऱ्याच्या दिशेने परतत होते. याचवेळी गवसे ते धनगरमोळा दरम्यान अचानक कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जोरात आदळली आणि त्यानंतर थेट चरीत जाऊन कोसळली. कारच्या पुढील भागाचा चक्काचूर अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेमुळे वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भीषण दुर्घटनेत समर्थ पांगम याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत प्रवास करणारा संस्कार सुतार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारच्या मागील सीटवर बसलेला प्रथमेश वाजंत्री याचे नशीब बलवत्तर ठरले. या भीषण अपघातातून तो सुखरूप बचावला असून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. एकाच कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांपैकी एका मित्राचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी आणि तिसरा सुखरूप बचावल्याने या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर या अपघातातील मृत समर्थ पांगम हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. समर्थचे वडील पांडुरंग पांगम हे 2004-05 च्या सुमारास कोकणातून आजरा येथे आले होते. सुरुवातीला संघर्ष करत त्यांनी स्वतःची नर्सरी उभी केली. फळझाडे आणि फुलझाडांची रोपे विक्रीचा व्यवसाय सुरू करून त्यांनी मेहनतीच्या जोरावर प्रगती केली. कष्टाने उभ्या केलेल्या संसाराचा आधार असलेला एकुलता एक मुलगा समर्थ याचे अपघाती निधन झाल्याने पांगम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या मुलाच्या भविष्याची स्वप्ने पाहिली होती, त्याच मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची गर्दी अपघाताची माहिती मिळताच समर्थच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सरवदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताबाबत अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अकरावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर काही क्षण मित्रांसोबत आनंदात घालवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या समर्थचा प्रवास कायमचाच थांबला. सुट्टीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने तीन मित्रांच्या आनंदावर विरजण तर घातलेच, पण एका कुटुंबाचे आयुष्यही उद्ध्वस्त केले. आजरा परिसरातून या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा…. हिवरखेड नगरपालिकेत भाजपकडून शिंदेसेनेला धक्का:4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव 15 विरुद्ध 5 मतांनी मंजूर राज्यात महायुतीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र सत्तेत असले, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमधील मतभेद वारंवार समोर येत आहेत. आता अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेतही या राजकीय संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 4 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील प्रस्ताव नगरपरिषदेच्या विशेष सभेत 15 विरुद्ध 5 अशा बहुमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रस्तावाच्या बाजूने भाजपच्या नगरसेवकांनी मतदान केल्याने महायुतीतील दोन्ही पक्षांमधील स्थानिक राजकीय समीकरणांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *