![]()
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना आता पक्षाकडून अधिकृतपणे उत्तर देण्यात आले आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असून महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचे सांगत पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले आहे. पक्षात कोणताही अंतर्गत संघर्ष नसून सर्व काही सुरळीत सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील राजकीय घडामोडींमुळे पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश होता. या भेटीत पक्षातील काही निर्णयांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पक्षातील नेत्यांना विश्वासात न घेता नियुक्त्या केल्या जात असल्याने काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे अजित पवार गटात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. अमित शाहांच्या भेटीमागचे कारण काय? अमित शाह यांच्या भेटीवर बोलताना उमेश पाटील यांनी माध्यमांमधील वृत्तांकन चुकीचे असल्याचे म्हटले. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि पार्थ पवार यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच वेळी पक्षाच्या अन्य नेत्यांच्या शिष्टमंडळासाठीही भेटीची वेळ निश्चित करण्यात आली होती. या शिष्टमंडळातील नेते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली होती, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्षातील कोणत्याही संकटामुळे किंवा अंतर्गत नाराजीमुळे हे शिष्टमंडळ अमित शाह यांना भेटले नव्हते, असा दावा त्यांनी केला. या भेटीचा पक्षातील नाराजीशी संबंध जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यमांनी या भेटीबाबत केलेले वार्तांकन वस्तुस्थितीला धरून नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. भुजबळांच्या नाराजीवरही स्पष्टीकरण पक्षातील नियुक्त्यांवरून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवरही उमेश पाटील यांनी भाष्य केले. कोणत्याही पक्षात पदाधिकारी आणि महत्त्वाच्या नियुक्त्या करताना प्रत्येकाला संधी देणे शक्य नसते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, याचा अर्थ पक्षात मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे, असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भुजबळ यांच्याशी संबंधित नियुक्त्यांचा विषय पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला होता. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर भुजबळ यांनीही संबंधित निर्णयाला मान्यता दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावरून पक्षात मतभेद असल्याचे चित्र निर्माण करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आमदारांच्या निधीच्या तक्रारी मान्य; नेतृत्वाला दिली माहिती दरम्यान, पक्षातील काही आमदार विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार करत असल्याच्या मुद्द्यावर उमेश पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले. विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी मान्य केले. आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याची बाब पक्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रश्नावर पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार? पत्रकार परिषदेत अर्थखात्याच्या मुद्द्यावरही उमेश पाटील यांनी भाष्य केले. अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची अपेक्षा असल्याचे सांगत आम्ही त्याची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील खातेवाटप आणि राष्ट्रवादीला अर्थखाते मिळण्याच्या शक्यतेबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. रोहित पवारांवरही साधला निशाणा या पत्रकार परिषदेत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवार यांच्या कुटुंबाबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात श्रद्धा आणि अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. मात्र, रोहित पवार यांनी दुसऱ्यांच्या पक्षातील घडामोडींवर भाष्य करण्यापेक्षा आधी स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार यांनी आधी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून येण्याची चिंता करावी आणि त्यानंतर इतरांच्या पक्षातील घडामोडींवर बोलावे, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ‘आधी आपलं घर सांभाळावं आणि मग गावकी बघावी,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. एकीकडे वरिष्ठ नेत्यांच्या अमित शाह भेटीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजीच्या चर्चांना उधाण आले असताना, दुसरीकडे पक्षाने या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. नियुक्त्यांबाबतची नाराजी, आमदारांच्या निधीचा प्रश्न आणि अर्थखात्याबाबतची भूमिका या मुद्द्यांवर उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षातील या विषयांवर काय निर्णय होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… सर्वोच्च न्यायालयाचा दणका, अखेर मुंबई महापालिकेची माफी:बोरीवलीतील ‘बेस्ट’ डेपोचे अतिक्रमण हटवले; आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच घेतले नमते बोरिवलीतील BEST बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना चांगलाच दणका दिला होता. न्यायालयाच्या दोन आदेशांचे पालन न केल्यामुळे आयुक्तांना अवमान प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. एवढेच नाही तर, या अवमान प्रकरणाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत आयुक्त आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे कठोर निर्देशही न्यायालयाने दिले होते. सविस्तर वाचा….
Source link
राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजी नाहीच:अमित शाहांच्या भेटीमागचे कारण उमेश पाटलांनी सांगितले, पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम