दिल्लीतील आंदोलनादरम्यान काँग्रेस खासदारांच्या बसमधील व्हिडीओवर चालवल्या जाणाऱ्या अपप्रचाराचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “खासदार श्यामकुमार बर्वे आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात
.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या कारभारावर प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांना जाहीर केलेली 5,000 रुपयांची तुटपुंजी मदत, ‘गोकुळ’ दूध संघावर 4 स्वीकृत सदस्य लादण्याचा असंवैधानिक निर्णय, कोकणातील संघटनात्मक पुनर्बांधणी आणि भाजपसोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षांची लाचारी यावर त्यांनी भाष्य केले.
बहीण-भावाच्या नात्याचे विकृतीकरण; भाजपला शरम वाटली पाहिजे!
बस प्रवासातील व्हायरल व्हिडीओवर काँग्रेसची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले, “सकाळपासून भाजपने एक विकृत टूलकिट चालवली की मारले, मारले, अभद्र वर्तन केले, गुंडगिरी केली. मुळात हा व्हिडीओ काँग्रेस खासदारांनीच सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो अर्ध्या सेकंदापेक्षा कमी भाग क्रॉप करून सिलेक्टिव्ह पद्धतीने चालवण्यात आला. राजकारणात विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.”
घरगुती संवाद आणि स्त्री दाक्षिण्य
“दोन्ही खासदारांचे मतदारसंघ जवळचे असून ते एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. आपल्या घरांमध्येही अशी टपली मारणे किंवा थट्टा-मस्करीचा संवाद स्वाभाविक असतो. एका बहिणीशी केलेल्या संवादाला महिलांशी गैरवर्तन ठरवणे हे भाजपच्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे.”
खोट्या ईमेल तक्रारींवर कायदेशीर कारवाई
“काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने अशी कोणतीही तक्रार पाठवलेली नाही. हा बेनामी आणि फेक ईमेल आहे. खोटे बोला, रेटून बोला या नीतीचा वापर करून बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत काँग्रेस पक्ष कायदेशीर सल्ला घेत आहे.”
5,000 रुपयांत स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करा
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले, “गेल्या 90 दिवसांपासून राज्यात पाऊस नाही, शेतकऱ्यांनी खिशातले सर्व भांडवल जमिनीत ओतले, डोळ्यांदेखत पिके करपून वाळली. अशा गंभीर संकटात शेतकऱ्यांना अवघे 5,000 रुपये देऊन त्यांची क्रूर थट्टा केली जात आहे. फडणवीसांनी स्वतः 5,000 रुपयांत आपल्या घरी दिवाळी साजरी करून दाखवावी. काँग्रेस शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 1 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची आग्रही मागणी करत आहे. तुटपुंजे 5,000 रुपये देऊन स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांची कीव करावीशी वाटते.”
गोकुळवरील 4 शासननियुक्त सदस्य घटनाबाह्य
कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघावर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर सपकाळ यांनी थेट आव्हान दिले. “गोकुळ निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला साडेपाच लाख शेतकऱ्यांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र ‘सर्व विरुद्ध एक’ अशी लढाई जिंकल्यानंतरही सत्ताधारी पराभव पचवू शकत नाहीत. स्वीकृत (Co-opted) सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे पूर्णपणे घटनाबाह्य आणि राजधर्मबाह्य आहे. महापालिका किंवा नगरपालिकेतही स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नसताना गोकुळसाठी हा घाट का घातला गेला?”
संविधान बचाव, गोकुळ बचाव
“‘वन मॅन, वन व्होट, वन व्हॅल्यू’ या संविधानाच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली केली जात आहे. आम्ही सरकारचा हा निर्णय न्यायालयात खेचू आणि या 4 शासननियुक्त सदस्यांचा मतदानाचा अधिकार रद्द करून सरकारला तोंडघशी पाडू.”
अमित शहा आणि फडणवीस रोज खच्चीकरण करतात
महायुतीमधील सत्तासंघर्षावर भाष्य करताना त्यांनी मित्रपक्षांच्या लाचारीवर बोट ठेवले. “अजित पवारांच्या अपघाताला 9 महिने उलटले, तरी घातपात की अपघात याचे उत्तर मिळालेले नाही. त्यांचा अर्थ विभागही काढून घेण्यात आला. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे रोज मित्रपक्षांचे निर्णय रद्द करतात, त्यांचे खच्चीकरण करतात. ‘तुझं माझं जमेना आणि सत्तेवाचून करमेना’ अशी यांची अवस्था झाली आहे. शिंदे सेना आणि अजित पवार गटात जर काडीचाही स्वाभिमान शिल्लक असेल, तर त्यांनी या लाचारीतून बाहेर पडून तत्काळ सत्तेचा त्याग करावा.”
कोकणातील 16 जिल्हा कमिट्यांची बैठक
पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी संघटनात्मक निर्णयांची आणि पक्षप्रवेशाची माहिती दिली. “टिळक भवनात आज कोकण विभागातील सर्व 16 जिल्हा काँग्रेस कमिट्यांची आढावा बैठक झाली. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा प्रभारींच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांसाठी ‘दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्या’ची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.”
पुण्यातील शिरोळे परिवाराचे स्वागत
“पुण्याच्या जडणघडणीत सात पिढ्यांचे योगदान राहिलेल्या आणि काँग्रेस विचारांशी जुनी नाळ असलेल्या रणजीतसिंह शिरोळे यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ‘आप’ आणि इतर पक्षांतील सहकाऱ्यांचेही पक्षात स्वागत करण्यात आले असून, आगामी काळात विचार आणि व्हिजन असलेल्या सक्षम नेतृत्वाची मोठी फळी काँग्रेसमध्ये उभी राहील,” असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
——————————————————————————
हेही वाचा…
बसमध्ये काँग्रेसच्या महिला खासदाराला चापट?: व्हिडीओ व्हायरल होताच टीकेची झोड; बर्वे म्हणाले- बहिणीशी थट्टा चालली होती; धानोरकर म्हणाल्या- बदनामी चुकीची

काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलक खासदारांना घेऊन जाणाऱ्या बसमधील एका व्हिडिओवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे हे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हात लावताना (हलकी चापट मारताना) दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्याच काही कथित पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे थेट ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा करत शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी