Headlines

ठाण्यात झाडांवरील बेकायदेशीर रोषणाई हटवण्याचे आदेश:नुकसान करणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार, महापालिका आयुक्तांचा इशारा




सण-उत्सव आणि सजावटीच्या नावाखाली शहरातील झाडांवर करण्यात येणाऱ्या बेकायदेशीर विद्युत रोषणाईविरोधात ठाणे महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकून त्यावर विद्युत माळा, तारा आणि केबल्स गुंडाळणाऱ्यांविरोधात आता थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरातील झाडांवर लावण्यात आलेली सर्व प्रकारची रोषणाई आणि विद्युत वायर तातडीने हटवण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात केवळ नोटीस किंवा दंडात्मक कारवाई न करता थेट FIR दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याने अशा प्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये झाडांवर आकर्षक रोषणाई करण्याच्या नावाखाली विद्युत दिव्यांच्या माळा आणि केबल्स गुंडाळल्या जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी रोषणाईसाठी झाडांच्या खोडांमध्ये लोखंडी खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे झाडांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा निर्माण होण्यासोबतच त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेचे याचिकाकर्ते आणि पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. रोहित जोशी यांची आयुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिका क्रमांक १३/२०२४ च्या माध्यमातून रोहित जोशी यांनी झाडांचे संरक्षण आणि संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी शहरातील झाडांवर होत असलेल्या बेकायदेशीर रोषणाईचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या प्रकाराचे जिओ-टॅग छायाचित्रांसह पुरावे प्रशासनाकडे सादर केले. या छायाचित्रांमधून हिरानंदानी इस्टेट आणि हिरानंदानी मेडोज परिसरातील शेकडो झाडांवर विद्युत रोषणाईसाठी केबल्स गुंडाळण्यात आल्याचे दिसून आले. काही झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकून विद्युत सजावट करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारांमुळे झाडांना कायमस्वरूपी नुकसान पोहोचण्याची शक्यता असून, ही बाब महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, १९७५ चे उल्लंघन असल्याचे याचिकाकर्त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तांचे तीन महत्त्वाचे आदेश; दोषींवर थेट कारवाई रोहित जोशी यांनी सादर केलेल्या तक्रारीची आणि न्यायालयातील प्रलंबित जनहित याचिकेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील झाडांवर लावण्यात आलेल्या विद्युत दिव्यांच्या माळा, केबल्स आणि इतर सजावटीचे साहित्य तातडीने हटवून जप्त करण्यास सांगण्यात आले आहे. झाडांच्या खोडांमध्ये ठोकलेले खिळेही काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय झाडांचे नुकसान करणाऱ्या सोसायट्या, व्यापारी संकुले किंवा संबंधित व्यक्तींविरोधात वृक्ष संरक्षण कायद्यानुसार थेट FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे झाडांवर रोषणाई करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी शहरातील दुकानदार, व्यावसायिक आणि गृहनिर्माण संस्थांना स्पष्ट सूचना देणारी परिपत्रके आणि जाहीर नोटिसा प्रसिद्ध करण्याचेही निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. झाडांवरील रोषणाईमुळे पक्ष्यांच्या अधिवासालाही धोका झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई आणि केबल्स लावल्याने केवळ झाडांचे नुकसान होत नाही, तर त्यावर अवलंबून असलेल्या जैवविविधतेवरही परिणाम होऊ शकतो. झाडांच्या फांद्यांवर आणि पानांमध्ये राहणाऱ्या पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला यामुळे धोका निर्माण होतो. तसेच विद्युत तारा आणि केबल्समुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सततच्या विद्युत रोषणाईमुळे स्थानिक सूक्ष्म हवामानावर आणि तापमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही रोहित जोशी यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विजेच्या वापरावरही प्रश्न सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे संकट असल्याचा मुद्दा उपस्थित करत रोहित जोशी यांनी शहरांमधील अनावश्यक विद्युत रोषणाईवरही आक्षेप घेतला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पाणी व इतर मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत असताना, केवळ सजावटीसाठी झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करणे असंवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासोबतच विजेचा जबाबदारीने वापर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शेवटचा खिळा आणि वायर निघेपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याची मागणी महापालिका आयुक्तांनी तक्रारीची तातडीने दखल घेत कठोर आदेश दिल्याबद्दल रोहित जोशी यांनी समाधान व्यक्त केले आहे. झाडांच्या खोडांमध्ये खिळे ठोकणे आणि त्यांना विद्युत तारांनी बांधून ठेवणे हा वृक्ष संरक्षण कायद्यानुसार गंभीर प्रकार असून, निसर्गावर होणारा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच केवळ आदेश देऊन थांबू नये, तर प्रत्यक्षात संपूर्ण ठाणे शहरातील झाडांवरून रोषणाई आणि विद्युत तारा हटवल्या जात आहेत की नाही, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील प्रत्येक झाडावरील शेवटचा खिळा आणि वायर काढली जाईपर्यंत ही कारवाई सुरू ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या या आदेशांमुळे ठाणे शहरातील बेकायदेशीर वृक्ष रोषणाईचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता महापालिका प्रशासन या आदेशांची अंमलबजावणी किती वेगाने करते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्यक्षात किती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… छत्रपती संभाजीनगरच्या विकासात MIM चं योगदान काय?:मंत्री अतुल सावेंचा हल्लाबोल, मुलाच्या शाही लग्नाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना 1 कोटींची मदत “छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासात एमआयएमचे (MIM) काडीचेही योगदान नाही. शहराच्या विकासावर बोलण्यासारखे यांच्याकडे काहीच नसल्याने केवळ जातीयवादी संघटना चालवून जुने मुर्दे उकरून काढणे आणि सामाजिक वातावरण बिघडवणे हाच त्यांचा एकमेव धंदा आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत राज्याचे गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एमआयएमवर जोरदार निशाणा साधला. एमआयएम नेत्या सहर शेख यांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या जन्मदिनाचे उदात्तीकरण केल्याच्या प्रकरणावरून मंत्री सावे यांनी हा थेट हल्ला चढवला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *