Headlines

Pune Metro Line 3 Becomes Indias First All-Women Operated Project



पुणे मेट्रो मार्गिका-३ देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार आहे. या प्रकल्पावर सुमारे ८,३१३ कोटी रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

.

या मार्गिकेवर सुमारे १०० महिला ट्रेन पायलट काम करतील. स्थानकांवरील ५० टक्के कर्मचारीही महिला असतील. पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाल्या.

पुणे मेट्रो मार्गिका-३ ही सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारलेली देशातील पहिली मेट्रो मार्गिका आहे. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेची पायाभरणी झाली होती.

टप्पा-२ मधील चार विस्तारित मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज या मार्गिकांचे भूमिपूजन होत आहे. ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९,८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जातील. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होईल.

या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असे पवार यांनी सांगितले.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) तयारीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे योगदान होते. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. जुलैमध्ये त्यांनी हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

मेट्रो स्थानकांपर्यंत जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ही कामे पूर्ण होण्याकडे पालकमंत्री म्हणून स्वतः बारकाईने लक्ष देणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *