![]()
गेल्या अनेक दिवसांपासून प्रखर उष्णता आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांत झालेल्या या पावसामुळे तापमानात घट होऊन सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला रविवारी पावसाने चिंब भिजवले. दिवसभराच्या कडक उन्हानंतर संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि हलक्या पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असून, उन्हाच्या काहिलीपासून नागरिकांना सुटका मिळाली आहे. नाशिक आणि जळगावमध्ये शेतीच्या कामांना वेग नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यामुळे मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे. जळगावमधील चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातही सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि जोरदार पाऊस बरसला. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसाचे नागरिकांनी स्वागत केले असून, शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने बळीराजा सुखावला आहे. बीडमध्ये पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाले बीड जिल्ह्याच्या लिंबागणेश परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र, या वादळाचा फटका मसेवाडी येथील शेतकऱ्यांना बसला आहे. जोराच्या वाऱ्यामुळे काही शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडून गेले असून, ऐन पावसाळ्यात कुटुंब उघड्यावर आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत असून वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. मशागतीच्या कामांना गती मान्सूनपूर्व पावसाच्या या आगमनामुळे आगामी खरीप हंगामासाठी शेतजमिनी तयार करण्याच्या कामांना आता मोठी गती मिळणार आहे. पावसाने जमिनी ओलावल्याने शेतकरी आता मशागतीची उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. मान्सून अद्याप केरळातच; पेरणीबाबत खबरदारी दरम्यान, मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणारा वादळी पाऊस हा मान्सूनचा पाऊस नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नसल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे आगमन लांबणीवर पडले आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये. पुरेशा पावसाअभावी पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असल्याने, मान्सूनचे अधिकृत आगमन आणि जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:चंद्रपूर, नाशिकसह जळगाव-बीडमध्ये वादळी वाऱ्यासह सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा