![]()
जायकवाडी धरण परिसरात रविवारी (दि. 31) सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली, धरण पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या सात मित्रांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अंबिका नगर, मुकुंदवाडी परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका नगर (मुकुंदवाडी) येथील सात युवक रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि जायकवाडी धरण परिसर पाहण्यासाठी पैठण येथे आले होते. दिवसभर धरण परिसरात फिरल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही युवक पाण्याच्या काठावर गेले. त्यावेळी अनिकेत मनू भारती (वय 19) आणि संकेत सिद्धार्थ खरात (वय 18) हे दोघे पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल भागात गेले आणि बुडू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ बचावकार्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच दोघेही पाण्याखाली गेल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी येऊन शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षणासाठी झटणाऱ्या दोन तरुणांचे स्वप्न अधुरे मृत्यूमुखी पडलेले अनिकेत भारती आणि संकेत खरात हे दोघेही शिक्षण घेत होते. कुटुंबीयांच्या अपेक्षा आणि भविष्यातील अनेक स्वप्ने उराशी बाळगून ते शिक्षणाच्या वाटेवर होते. मात्र एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पैठणकडे धाव घेतली. रुग्णालय परिसरात हृदय हेलावून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. पर्यटनस्थळी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर जायकवाडी धरण परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक, विद्यार्थी आणि भाविक भेट देतात. मात्र अनेकजण पाण्याची खोली आणि धोकादायक भागांचा अंदाज न घेता पाण्याजवळ जात असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे दिसून येते. धरण परिसरात अधिक सुरक्षारक्षक, सूचना फलक आणि धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाचे आवाहन धरण, नदी, तलाव किंवा जलाशय परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी केले आहे.
Source link
जायकवाडी धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू:खोलीचा अंदाज चुकला अन् काळाने घातली झडप, सुट्टीचा बेत ठरला जीवघेणा