Headlines

राज्यात 3 वर्षात 44 लाख मेट्रिक टन खतांचा वापर:'डीएपी' तुटवड्यामुळे कृषी विभागाचा पर्यायी खतांचा सल्ला




राज्यात मागील तीन वर्षात खरीप हंगामात सरासरी 44 लाख मेट्रीक टन रासायनीक खतांचा वापर झाला आहे. आगामी काळात खरीपासाठी डीएपी खताचा संथगतीने होत असलेला पुरवठा लक्षात घेऊन डीएपी खतासाठी पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला कृषी खात्याने दिला आहे. राज्यात खरीप हंगामात सर्वात जास्त खताची मागणी होते. राज्यात मागील तीन वर्षांत खरीप हंगामात सुमारे 44 लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला असून त्यामध्ये युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते तसेच एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा प्रामुख्याने समावेश आहे. राज्यात लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. डिएपी खतामध्ये 18 टक्के नत्र व 46 टक्के स्फुरद ही अन्नद्रव्ये असतात. मात्र, राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने पर्यायी खतांचा वापर करणे आवश्यक ठरत आहे. स्फुरदयुक्त खतांमध्ये डीएपीनंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशांतर्गत तयार होत असून त्यामध्ये 16 टक्के स्फुरदसह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. सल्फर अन्नद्रव्यामुळे तेलबिया पिकांमध्ये या खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व तीन गोण्या एसएसपी खतांचा वापर हा डीएपी खतासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16, युरिया एसएसपी कॉम्पलेक्स तसेच एनपीके-15:15:15 या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरदाबरोबरच पालाश हे अन्नद्रव्यही पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर पिकांच्या वाढीसाठी अधिक पोषक ठरतो. तसेच टिएसपी या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्य असते. डिएपी खताच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया व एक गोणी टिएसपी खतांचा वापर केल्यास तोदेखील डिएपी खताचा उत्तम पर्याय ठरतो.चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करून संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *