![]()
राज्यात गेल्या 30 ते 35 दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. जवळपास 70 टक्के सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकार मनोज जरांगे पाटलांसमोर गुडघे टेकण्यात व्यस्त आहे. आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि सरकारने युद्धपातळीवर पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह खरीप पिकांवर संकट आले आहे. सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, तूर खरीप पिके करपून गेली आहेत. तर मराठवाड्यातील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवा असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिलाय. शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटात सापडला असून, जवळपास 70 टक्के सोयाबीनचे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून ते पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू MPSC परीक्षांमधील गैरप्रकारांवर बोलताना वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. MPSC अध्यक्ष स्वच्छ असल्याचे सांगत आहे. पण त्यांच्या काळात परीक्षा वारंवार रद्द झाल्या आहेत, त्याची जबाबदारी कोणाची आहे? केवळ मी स्वच्छ आहे असे सांगून प्रश्न सुटणार नाही, जेव्हा पेपर फुटले त्यासाठी जे जबाबदार होते त्यांच्यावरही कारवाई करावी, असे वडेट्टीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, MPSCच्या परीक्षांना भ्रष्ट स्वरूप देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचा झालेला आक्रोश हाच या परिस्थितीचा पुरावा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सरकार पळू शकत नाही. जरांगे पाटलांचे समांतर सरकार शिंदे समिती आणि आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ओबीसी नेत्यांनी उपोषण केले, त्यांची धरपकड झाली. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्यासमोर सरकार गुडघे टेकत आहे. या सरकारचे निर्णय मुख्यमंत्री घेत नाही तर समांतर असे सरकार जरांगे पाटील चालवत आहे. महायुती सरकार ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून राजकीय दबावापुढे झुकत आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनकर्त्यांच्या दबावापुढे पाहिजे त्या पद्धतीने GR काढून राज्यातील आरक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, भविष्यात कोणाचेही आरक्षण सुरक्षित राहणार नाही, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. डिजिटल नोंद उपलब्ध नाही अहेरीतील कोसनपल्ली गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्न गंभीर आहे. येथील शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळाले आहेत. मात्र गावाची डिजिटल नोंद उपलब्ध नसल्यामुळे सातबारा उताऱ्यावर मालकी हक्काची नोंद होत नाही. या प्रश्नासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत कोसनपल्लीतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा आणि कायदेशीर मालकी हक्क मिळालाच पाहिजे यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
राज्यात 70% सोयाबीन उद्ध्वस्त:सरकार जरांगे पाटलांसमोर गुडघे टेकण्यात व्यस्त!; विजय वडेट्टीवार यांचा सडकून प्रहार