Headlines

राज ठाकरेंकडून साय डोंगरावरील वृक्षतोडीची पाहणी:अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेत्यांची उपस्थिती, आज कर्जतमध्ये जाहीर सभा




टोरेंट पॉवर कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी कर्जतमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला आणि वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज थेट कर्जतमधील ‘ग्राउंड झिरो’वर पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांसह कर्जतच्या साय डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष वृक्षतोडीची पाहणी करत आहे. या पाहणीनंतर आज कर्जतमध्ये त्यांची जाहीर सभा होणार असून, या सभेत ते नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. साय डोंगरावरील ‘ग्राउंड झिरो’वरून पाहणी गेल्या काही दिवसांपासून टोरेंट कंपनीच्या या प्रकल्पासाठी शेकडो वर्षांची जुनी झाडे तोडली जात असल्याचा आरोप होत आहे. या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी आज साय डोंगर परिसरात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. प्रकल्पावरून तापलेले राजकारण विरोधकांचा आक्रमक पवित्रा: मनसे, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी सरकारची तुलना ‘मानवी राक्षसांशी’ करत, तब्बल ३३ हजार झाडे तोडून सह्याद्री नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला होता. भाजपचा पलटवार: दुसरीकडे, भाजपने या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. चित्रा वाघ आणि नवनाथ बन आणि भाजप नेत्यांनी विरोधकांना ‘विकासविरोधी’ ठरवले आहे. हा प्रकल्प गुजरातचा नसून महाराष्ट्राचाच आहे, यात ३० हजार कोटींची गुंतवणूक आणि १४ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा दावा भाजपने केला आहे. तसेच, विरोधकांना लवासा प्रकल्प आणि मेट्रो कारशेडच्या विरोधाची आठवण करून देत, ‘स्वतःच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली?’ असा थेट सवालही भाजपने विचारला होता. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? प्रत्यक्ष साय डोंगरावर जाऊन वृक्षतोडीची पाहणी केल्यानंतर, राज ठाकरे आजच्या कर्जत येथील जाहीर सभेत या सर्व आरोपांचा कसा समाचार घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकास की पर्यावरण? या मुद्द्यावर राज ठाकरे यांची आजची तोफ कुणावर धडाडणार, याची उत्सुकता आहे. टोरेंट कंपनी काय तुमची जावई आहे का?- संदीप देशपांडे देशपांडे म्हणाले, दीडशे-दोनशे वर्षांची झाडे तोडून तुम्ही कसला विकास करत आहात? झाडे कापून कुठला ग्रीन प्रोजेक्ट होऊ शकतो? स्थानिक लोकांच्या मते, नद्यांवर आणि डोंगरात छोटे प्रकल्प होऊ शकतात, त्यासाठी एवढी मोठी जंगलतोड करण्याची गरजच नाही. गुजरातची ‘टोरेंट’ कंपनी या सरकारची जावई आहे का?” असा घणाघात त्यांनी केला. ‘अधिकृत रेकॉर्डनुसार ३२ हजार झाडे तोडण्याची परवानगी’ प्रत्यक्ष परिस्थितीचे विदारक चित्र मांडताना देशपांडे म्हणाले, “आम्हाला झाडांवर लिहिलेला २०७५ हा आकडा दिसला. पण स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार त्याहूनही अधिक झाडे कापली गेली आहेत. वनविभागाने ३२ हजार झाडे तोडण्याची परवानगी अधिकृतरीत्या दिलीच कशी? ग्रामपंचायतींचा कुठलाही ठराव नसताना आणि जनसुनावणीत लोकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता ही परवानगी दिली गेली आहे.” ‘अवैध नाही, म्हणजे वैध कशी?’ वनविभागाने ‘कुठलीही अवैध वृक्षतोड सुरू नाही’ असे स्पष्टीकरण दिले होते. यावर देशपांडे यांनी सडेतोड उत्तर दिले. “जर ही अवैध नाही, तर मग वैध कशावरून ठरते? लोकांना रस्ता हवा असतो तेव्हा वनविभाग सांगतो की झाडे कापता येणार नाहीत. आता ही वृक्षतोड वैध कशी झाली? यावर वनविभागाने थोबाड उघडून उत्तर द्यावे,” असे आव्हान त्यांनी दिले.

—————– हेही वाचा.. मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर:2 जागांवर मविआ, तर 3 जागांवर महायुती आघाडीवर
विधान परिषदेच्या 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबरला झालेल्या मतदानाची मोजणी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू झाली. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतपत्रिकांवर प्राधान्यक्रमाने मतदान होते. त्यामुळे मतमोजणी संथगतीने सुरू होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात रात्री 3 वाजता दीड फेरी पूर्ण झाली. त्यावेळी 1,01,519 मतांची मोजणी झाली होती. त्यापैकी 93,136 मते वैध ठरली, तर 8383 मते बाद झाली. यापैकी मविआ शरद पवार गटाचे डॉ प्रताप पाटील यांना 39,753 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांना 29,750 मते मिळाली होती. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *