![]()
छत्रपती संभाजीनगर मासिक पाळीच्या ‘त्या’ चार दिवसांत पोटदुखीचे कारण सांगून विद्यार्थिनींचे शाळेतून घरी निघून जाण्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण वाढले होते. या संवेदनशील समस्येवर कन्नड तालुक्यातील वडनेर तांडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी थेट तोडगा काढला आहे. सरकारी अनुदानाची वाट न पाहता शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून शाळेत अद्ययावत ‘सखी कक्ष’ उभारला आहे. यामुळे सहावी व सातवीतील विद्यार्थिनींची गळती थांबली आहे. शहरापासून ६० किमी अंतरावर असलेल्या वडनेर तांडा जि. प. शाळेत पहिली ते सातवीपर्यंत २४० विद्यार्थी शिकत आहेत. वयात येणाऱ्या विद्यार्थिनी दरमहा मासिक पाळीदरम्यान चार ते पाच दिवस शाळेला दांडी मारत असल्याचे निदर्शनास आले होते. मुलींचा हा संकोच आणि आरोग्याची अडचण ओळखून प्रभारी मुख्याध्यापक विनोद पवार यांच्यासह शिक्षकवृंद एकत्र आले आणि त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. या कक्षात विश्रांतीसाठी पलंग, आवश्यक प्रथमोपचार औषधी, व्हेंडिंग मशीन, वापरलेल्या पॅडच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर मशीन बसवण्यात आली आहे. मुलींमधील न्यूनगंड दूर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शाळेतील शिक्षिकांमार्फत नियमित समुपदेशन सत्रे घेतली जात आहेत. परिणामी, विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला आहे. शाळेत मुलींची उपस्थिती पूर्ववत झाली आहे. इतर शाळांतही हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. Ãसर्वच शाळांमध्ये असे सखी कक्ष उभारण्यात येतील. यासाठी सर्वांना सूचित केले आहे. कोणत्याही कारणामुळे त्यांचे शिक्षण सुटता कामा नये. सर्वच शाळांत आरोग्य सुरक्षेसाठी सोय असावी, असे आदेश दिले आहेत. -अश्विनी लाठकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी Ãमासिक पाळीदरम्यान मुलींना शाळेत थांबणे असह्य होत होते. त्या गैरहजर राहत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून स्वखर्चाने हा “सखी कक्ष’ उभारला. आता मुलींची गैरहजेरी थांबली आहे. – विनोद पवार, प्रभारी मुख्याध्यापक शाळेत मुलींची गैरहजेरी थांबली
Source link
गुरुजींनी स्वखर्चाने शाळेत उभारला ‘सखी कक्ष':कन्नडच्या वडनेर तांडा जि.प. शाळेमधील उपक्रम, विद्यार्थिंनीसाठी सुविधा