Headlines

राज ठाकरे स्टँडअप कॉमेडियन झालेत:त्यांच्या मेंदूचे 'फूटप्रिंट्स' तपासण्याची खरी गरज, अमित साटम यांचा जोरदार पलटवार




“ज्यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार नाही, त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट तपासण्याची भाषा करू नये. उलट राज ठाकरे यांच्याच मेंदूचे ‘फूटप्रिंट’ काढण्याची आता खरी गरज आहे,” अशा शेलक्या शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे आता केवळ ‘स्टँडअप कॉमेडियन’ झाले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स तपासा’बाबत मोठा दावा केला होता. “पोलिसांनी जंतरमंतर परिसरात पडलेला प्रत्येक दगड गोळा केला आहे. त्या दगडांवर असणारे ठसे आता आधार कार्डशी लिंक केले जातील,” असे ते म्हणाले होते. यावरून राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासावे लागतील, असा टोला लगावला होता. राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार अमित साटम यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना घेतला. यावेळी त्यांनी केवळ राज ठाकरेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केले. फालतू ॲक्टिंग करण्यापेक्षा मेरिटवर बोला राज ठाकरेंच्या भाषणांची आणि कार्यपद्धतीची खिल्ली उडवताना अमित साटम यांनी थेट त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या भाषणात किंवा आरोपांमध्ये नवीन काहीच नसते. ते घरात बसून स्टेटमेंट देतात आणि पक्षात जे थोडेफार कार्यकर्ते उरले आहेत, त्यांच्यासमोर भाषणे ठोकतात. आता ते फक्त स्टँडअप कॉमेडियन राहिले आहेत.” “‘शिवउद्योग’ स्थापन करून राज ठाकरेंनी किती मराठी तरुणांना रोजगार दिला? याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत. मोदी आणि महायुती सरकारने ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्किल डेव्हलपमेंट’च्या माध्यमातून लाखो तरुणांना उद्योजक बनवले. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आणली. राज ठाकरेंनी नुसती फालतू ॲक्टिंग करण्यापेक्षा या मेरिटवर डिबेट करून दाखवावे. त्यांना मराठी माणसाचा एवढाच पुळका आला असेल, तर त्यांनी बालमोहनमध्ये ॲडमिशन घेऊन दाखवावे,” असा टोला साटम यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना आता फक्त टोमणे मारण्याचे काम! यावेळी अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात घरात बसून सरकार चालवल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना ९० टक्के आमदारांनी त्यांची साथ सोडली. त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले, पक्ष गेला आणि चिन्हही गेले. आता त्यांच्याकडे रोज उठून टीका करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले नाही.” ठाकरेंनी मुंबईसाठी केलेले एक काम दाखवावे “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर किती वेळा पडले, याचा त्यांनी आधी हिशेब द्यावा. एवढी वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्ता भोगूनही मुंबईकरांसाठी केलेले एक तरी भरीव काम उद्धव ठाकरेंनी दाखवावे, हे माझे त्यांना खुले चॅलेंज आहे,” असे साटम म्हणाले. राहुल-उद्धव यांच्याकडे तपशिलाचा अभाव “राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोघेही कधीच मुद्द्यांवर किंवा मेरिटवर बोलत नाहीत. त्यांच्याकडे अभ्यासाचा किंवा तपशिलाचा अभाव आहे. त्यामुळे ते केवळ मिश्किलपणे बोलण्याचे आणि टोमणे मारण्याचे उद्योग करत आहेत,” असा घणाघात अमित साटम यांनी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *