Headlines

रोहित पवारांची शरद पवार गटाच्या बैठकीकडे पाठ:शरद पवारांनी तटकरे अन् प्रफुल्ल पटेल यांची प्रशंसा केल्याने नाराज झाल्याची चर्चा




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची प्रशंसा केल्यामुळे आमदार रोहित पवार नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार यांनी शरद पवार गटाच्या आज होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीकडेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहेत. सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोन्ही बडे नेते पक्षाच्या कार्यकारिणीतून डावलण्यात आल्यामुळे पक्ष नेतृत्वावर म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच या दोन्ही नेत्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शरद पवार गटाकडून सातत्याने पटेल व तटकरेंना लक्ष्य केले जाते. त्यातही आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांवर नेहमीच तोंडसूख घेतात. त्यानंतरही या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते क्षमतावान असल्याचा दावा करत त्यांची प्रशंसा केली. तसेच या दोन्ही नेत्यांच्या क्षमतेचा वापर कसा करून घ्यायचा हे पक्ष नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले होते. त्यांची ही प्रशंसा रोहित पवार यांच्या जिव्हारी लागल्याची माहिती आहे. यामुळेच ते आज शरद पवार गटाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या प्रशंसेमुळे शरद पवार गटातील इतर नेत्यांतही संभ्रमावस्था निर्माण झाल्याचाही दावा केला जात आहे. आजच्या बैठकीत विलिनीकरणावर चर्चा? दुसरीकडे, शरद पवार गटाच्या आजच्या चर्चेत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावर चर्चा होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे केव्हाच विलिनीकरण झाले असते, असा दावा शरद पवार गटाने अजित पवारांच्या निधनानंतर केला होता. पण सत्ताधारी राष्ट्रवादीने हा दावा धुडकावून लावत पक्षात अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणी प्रदिर्घ आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या मृत्यूचे खरात कनेक्शन उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे भोंदू अशोक खरात कनेक्शन समोर येत असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, ‘त्या’ सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे. सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल, ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *