![]()
राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावल्याची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीच्या जाचक अटी जोपर्यंत सरकार पूर्णपणे हटवत नाही, तोपर्यंत आपण एक पाऊलही मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे. सततच्या अन्नत्यागामुळे तिसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या शरीरावर परिणाम जाणवू लागला आहे. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाली आहे, तर रक्तदाब सध्या स्थिर आहे. ठोस आश्वासनाशिवाय सरकारवर विश्वास नाही! आंदोलनस्थळावरून रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला थेट इशारा दिला आहे. “गेल्या तीन दिवसांपासून शासनाकडून आणि कृषीमंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या आणि निमंत्रणे येत असली, तरी केवळ पोकळ शब्दांवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री किंवा सरकार अधिकृतपणे या जाचक अटी रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असे रोहित पवार म्हणालेत. पवार कुटुंबाची शिकवण “मी मोठ्या राजकीय कुटुंबातील असलो तरी, पवार साहेबांनी (शरद पवार) आम्हाला सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढण्याची शिकवण दिली आहे. आज माझ्या आंदोलनामुळे माझी आई, पत्नी आणि मुले चिंतेत आहेत. ते आज माझी भेट घेण्यासाठी पंढरपुरात येत आहेत.” दिग्गज नेते आंदोलनस्थळी दाखल होणार आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यभरातून विविध पक्षांचे दिग्गज नेते रोहित पवारांच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते खासदार संजय राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महादेव जानकर, शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे देखील आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. जरांगे पाटलांच्या समर्थकांनी आधीच रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आज जरांगे पाटील प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवारांची विचारपूस करणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारला आजचा ‘अल्टिमेटम’; उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आंदोलन आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. जर आज संध्याकाळपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही, तर उद्या (सोमवार) सकाळी ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ‘संत नामदेव पायरी’ येथे जाऊन आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. या इशाऱ्यामुळे आता राज्याचे गृहविभाग आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आहे. काय आहेत रोहित पवारांच्या मुख्य मागण्या? रोहित पवार यांच्या मते, सरकारच्या ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेत अनेक तांत्रिक अटींमुळे लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांना या योजनेत केवळ ₹५०,००० पर्यंतच मर्यादित ठेवण्याची अट रद्द करून सर्वांना सरसकट ₹२ लाखांची कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांना पुढील वर्षांचे कर्ज भरण्याची सक्ती न करता प्रोत्साहनपर अनुदान थेट खात्यात जमा करावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
Source link
रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या