![]()
मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे येथील चोऱ्या, गुन्हेगारीचे चित्रीकरण फुटेज थेट पोलिसांच्या तपासकामासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडून संपूर्ण अडत व्यापार पेठेत चहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेत दररोज जिल्ह्याभरातून शेकडो शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. त्यामुळे सातत्याने येथील व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आवक असते. विशेष म्हणजे जेवढा शेतमाल विक्रीसाठी येतो, त्या सर्व शेतकऱ्यांना येथील अडत व्यापाऱ्याकडून लिलावानंतर नगदी पट्टी दिली जाते. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांचा व्यवहार कोट्यवधी रुपयांत होतो. अनेक वेळा येथील व्यापाऱ्यांच्या कपाटातून, गल्ल्यातून पैसे चोरी जाण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे बाजार समिती प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकतेच सर्व अडत आणि बाजार समितीच्या आवारात चहुबाजूंनी बारा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. अशी माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी दिव्य मराठीकडे दिली आहे. दरम्यान बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरही सुरुवातीपासूनच १२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच कांदा मार्केटमध्येही यापूर्वीच ५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नुकतेच बाजार समितीकडून मुख्य अडत व्यापार पेठेत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण थेट बाजार समितीचे सचिव श्री. पवार यांच्या मोबाईलवरही कनेक्ट आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वाहनांची गर्दी पाहणे सोपे होणार आहे. लिलावावर लक्ष ठेवण्यासही मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने भर पडली मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे आणि नाव टिकून राहावे या दृष्टिकोनातून आमचे सातत्याने व्यापाऱ्यांना सुचना असते. शेतकरी सुखी तर जग सुखी या ब्रिजवाक्यानुसार सर्व संचालक मंडळाचे कांदा मार्केट असेल भुसार मार्केट यावर विशेष लक्ष असते. आता नवीन बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने भर पडली आहे. -शेषराव जाधव, सभापती बाजार समिती.
Source link
लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांवर नजर:बाजार समिती परिसरात कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, गुन्हेगारीला आळा बसणार