![]()
बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी बाजार समिती, पंचायत समिती व भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या भगवंत महोत्सवात चौथ्या दिवशी “ऑल दि बेस्ट” या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना खळखळून हसवले. प्रारंभी श्री भगवंताची आरती शहरातील देणगीदार डॉक्टर, व्यापारी आदींच्या हस्ते करण्यात आली. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला. देवेंद्र पेम लिखित व दिग्दर्शित या नाटकात मयूरेश पेम यांनी मुक्या मित्राची, मनमीत पेम यांनी बहिऱ्या मित्राची, तर निखिल चव्हाण यांनी आंधळ्या मित्राची भूमिका साकारली. झुई पेडखळे यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारत प्रभावी उपस्थिती दर्शवली. नाटकाची कथा तीन मित्रांभोवती फिरते. एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका असे हे तिघे एका मुलीच्या प्रेमात पडतात. त्यानंतर स्वतःच्या उणिवा लपवून एकमेकांना मागे टाकण्याच्या प्रयत्नातून निर्माण होणारे गैरसमज, प्रसंग आणि विनोदी घडामोडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, जि.प.अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, डॉ. बी. वाय. यादव, डॉ. प्रकाश बुरगुटे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. बी. वाय. यादव म्हणाले, भगवंत महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडत आहे. यामागे राजाभाऊंची मोठी मेहनत असून अनेकांनी सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आयोजित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक व सांस्कृतिक विकास साधणार यावेळी माजी आ राऊत म्हणाले, भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून बार्शी शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न असून, येत्या काळात श्री भगवंत मंदिर व परिसराचा सर्वांगीण कायापालट करण्यात येणार आहे.
Source link
विनोदी नाटक " ऑल दि बेस्ट' ने बार्शीकरांना खळखळून हसवले:नर्म विनोदी कथा, उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली