![]()
राज्यातील बैलगाडा शर्यत आता केवळ पुरुषांचे मैदान राहिलेले नाही. या खेळाच्या नव्या चॅम्पियन महिला आहेत. त्या केवळ बैलांवर पैज लावत नाहीत, तर त्यांना प्रशिक्षित करतात. देखभालही करतात आणि स्वतः बैलांची वेसण हाती घेऊन शर्यतीतही उतरत आहेत.
.
मुंबई, ठाणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव… राज्यभरातील पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यतीत मुली आणि महिलांची संख्या वाढत आहे. काहींचे कुटुंब पिढ्यान्पिढ्या बैलगाडा शर्यतीशी जोडलेले आहे, तर काही महिला मुलांच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या माध्यमातून या खेळापर्यंत पोहोचल्या. मग त्याचा भाग बनल्या. राज्यात दरवर्षी एक हजारांहून अधिक बैलगाडा शर्यती होतात. यातून आता २ हजार कोटींहून अधिक उलाढाल होते. ५० हजार ते एक लाख रुपयांत खरेदी केलेला बैल सलग शर्यती जिंकू लागला तर त्याची किंमत २५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
महिलांच्या सहभागामुळे मिळाला ट्रेंड
बैलगाडा शर्यतीच्या खेळात पूर्वी पुरुषांचे वर्चस्व होते, पण आता महिलाही बैलांच्या मालकीण बनत आहेत. त्या स्वतः मैदानापर्यंत पोहोचत आहेत. राज्यात वर्षभरात सुमारे एक हजारांहून अधिक स्पर्धा होतात आणि याभोवती २ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे. यामध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. -सर्जेराव चव्हाण, आयोजक,छत्रपती संभाजीनगर
सोशल मीडियाने मुलींना, त्यांच्या बैलांना नवी ओळख दिली
पूर्वी बैलगाडा शर्यतीची ओळख प्रामुख्याने स्थानिक मैदानांपर्यंत आणि गावांपुरतीच मर्यादित होती. आता सोशल मीडियावर बैलांच्या शर्यती, त्यांची तयारी आणि मालकांचे व्हिडिओ वेगाने लोकप्रिय होत आहेत. याचा परिणाम महिलांच्या सहभागावरही दिसत आहे. तरुण मुली एकमेकींना पाहून प्रेरित होत आहेत आणि पारंपरिकरीत्या पुरुषांचा खेळ मानल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीत महिला वेगाने उतरत आहेत. आता महिला बैलांच्या मालकीणही बनत आहेत, त्यांच्या खरेदी, देखभाल आणि तयारीबाबत निर्णय घेत आहेत.
1. ८० लाखांच्या बैलाची मालकीण आहे, त्याची देखभाल स्वतः करते नववीत शिकणारी मुंबईची हृदया पाटील आजोबांचा वारसा चालवत आहे. तिच्या आजोबांना बैलगाडा शर्यतीचा शौक होता. कुटुंबाकडे मेहबूब, मेहरबान, रॉबिन आणि रायफल नावाचे चार बैल आहेत. यापैकी अनेक शर्यती जिंकल्यानंतर मेहरबानची किंमत ८० लाख रुपयांपर्यंत लागली आहे. पण तिने त्याला विकले नाही. हृदया स्वतः मैदानावर जाते आणि बैलांची देखभाल करते. तिच्यासाठी बैल केवळ स्पर्धेचा भाग नाही, तर कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत.
2. मुलांच्या छंदामुळे जोडल्या, शर्यतीच्या बैलांच्या मालकीण जळगावच्या चाळीसगाव येथील सोनाली बोराडे यांचा बैलगाडा शर्यतीशी संबंध मुलांमुळे आला. मुलांनी बैल खरेदीचा हट्ट धरला तेव्हा त्या पहिल्यांदा मैदानावर पोहोचल्या. त्यांच्या बैलाने शर्यत जिंकली.कुटुंबाला परिसरात ओळख मिळाली. मग सोनाली स्वत: या खेळाशी जोडल्या गेल्या. आता त्या एक्का व बादशाह नावाच्या दोन बैलांना सांभाळतात. एक्काने अनेक स्पर्धा जिंकल्या. एका वर्षात त्याची किंमत २५ लाखांवर पोहोचली. त्या बादशाहला तयार करत आहेत.
3. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच मैदानही सांभाळतात, गाजवतात स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथील सपना कीर्तिकर यांना बैलगाडा शर्यतीचा शौक आहे. त्या आपला बैल शंकर याची स्वतः देखभाल करतात व स्पर्धांदरम्यान मैदानावर उपस्थित राहतात. त्या म्हणतात की, बैलाची देखभाल करणे ही नियमित जबाबदारी आहे. अभ्यासाप्रमाणे यातही शिस्त, वेळ, मेहनत गरजेची आहे. या खेळाने माझ्यात आत्मविश्वास वाढवला. बैलाच्या देखभालीपासून ते प्रशिक्षणापर्यंतची सर्व काम मी स्वतःच पाहते.
4. माहेरी छंद लागला अन् सासरी बैलगाडा शर्यत जिंकली माझ्या माहेरी अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचा खेळ होत असे. त्यामुळे लहानपणापासूनच या शर्यतींची आवड होती. माझे शिक्षण नववीपर्यंतच झाले. सासरी आल्यानंतर मी पुढाकार घेतला आणि २०१६ पासून माझ्या पतीला बैलगाडा शर्यतीचा शौक लावला. आजही मी शेती सांभाळण्यासोबतच हा शौक पूर्ण करत आहे. माझ्या दोन्ही मुली एमबीबीएस डॉक्टर आहेत. माझ्याकडे ‘साईचा राजा’ नावाचा सुमारे ५० लाख रुपयांचा आणि ‘जीवा’ नावाचा ८ लाख रुपये किमतीचा बैल आहे.