![]()
वाढेगाव माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पं
.
सन २०२५ मध्ये जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने एक प्रयोग हाती घेऊन अप्रुका नदीवर जि.प. सदस्य अतुल पवार यांच्या सहयोगातून बांधलेल्या सिमेंट नाल्याच्या पाणीसाठाक्षेत्रात शंभर-शंभर फूट खोलीच्या पाच कूपनलिका खोदून त्यामध्ये ७-८ फूट उंचीच्या जमिनीच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच फूट उंच राहतील, अशा केसिंग पाईप लावल्या. त्या पाईपला छोटी छिद्रे पाडून त्यामध्ये खडे, गाळ जाऊ नये म्हणून पाईपला वायरचे कापड गुंडाळले तसेच पाइपच्यावरील तोंडावर झाकण लावून त्या झाकणाला छिद्रे पाडून त्यावर वायरचे कापड गुंडाळले.
नंतर पाइप भोवती ५ फूट लांब, ५ फूट रुंद व ५ फूट खोलीचे खड्डे घेऊन ते खड्डे छोटी खडी, मध्यम खडी व दगड असे थर देऊन खड्डे बुजवण्यात आले. मे २०२५ मध्ये पाऊस होऊन सिमेंट बंधाऱ्यात साठलेले पाणी त्या परिसरात गेले आणि पाणी साठ्यात वाढ झाली. गावात साकारलेल्या या पंचशतावरी प्रकल्पामुळे ऐन उन्हाळ्यातही परिसरातील विहिरी तसेच कूपनलीकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. आजवर दरवर्षी कोरड्या असणाऱ्या विहिरीत या आगळया प्रकल्पामुळे पाणी आलेले पाहून शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत असून प्रकल्पाचे कौतुकही होत आहे.
८० फूट खोलीची मोठी विहीर पाडल्यापासून एक मुशी पाषाण दगड लागल्याने विहिरीत एक थेंबही पाणी येत नव्हते. परंतु सिमेंट बंधाऱ्यात पंचशतावरी प्रकल्प राबवल्यामुळे पाझराद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी विहिरीत साठत असल्याचे शेतकरी दादासाहेब सोनलकर यांनी सांगितले. या कामासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव व पंढरपूरचे डॉ. आनंद भिंगे, डॉ. मच्छिंद्र सोनलकर, सुहास बाजारे आदींचे सहकार्य लाभले.
संस्थेच्या माध्यमातून माण नदी पात्र स्वच्छ केले तरी त्यामध्ये काही प्रमाणात पाणी टिकले तर वृक्षवेली, पशुपक्षी यांचे अस्तित्व राहील. नदीला मिळणाऱ्या ओढ्यामधील पाणी भूगर्भात जिरवले तर ते पाणी नदीपात्राकडे येईल. या हेतूने आमच्या संस्थेने जलसंधारणाचे नवीन अभियान राबवले व त्याचे सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे या वर्षात दोन ठिकाणी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये असेच प्रयोग राबवणार आहोत. – वैजिनाथ घोंगडे (अध्यक्ष, माणगंगा भ्रमणसेवा संस्था)