Headlines

वसमतजवळ भीषण अपघात:शेतातील काम आटोपून परतताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू




वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 17 पहाटे उघडकीस आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली माधव कदम (18) याचे अकोली शिवारात शेत आहे. दोन एकर शेतात काम करून तो रोजमजूरीची कामेही करीत होता. त्याचे आई, वडिल देखील रोजमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु असून ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात आहे. त्यासाठी दिवसाच्या वेळी व रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ज्ञानेश्‍वर हा ट्रॅक्टर घेऊन कामासाठी शेतात गेला होता. शेतात काम करून तो पहाटेच्या सुमारास घराकडे येत असतांना अकोलीच्या कालव्याच्या रस्त्यावरून त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ट्रॅक्टर ट्रॉलीसह कालव्यात कोसळळे. या अपघातात ज्ञानेश्‍वर याच्या अंगावरच ट्रॅ्क्टरचे हेड पडल्यामुळे हेड खाली दबल्या गेल्या. त्याला बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारास काही शेतकऱ्यांनी सदर प्रकार बघितल्यानंतर तातडीने वसमत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गावकऱ्यांचीही घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर काढून त्याखाली दबलेला ज्ञानेश्‍वर याचा मृतदेह काढण्याची तयारी चालवली आहे. मयत ज्ञानेश्‍वर हा एकुलता एक होता. घरातील एकुलता एक मुलगा गेल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *