Headlines

वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका




मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही, तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या जात आहेत. वाल्मीक कराड सध्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. गत 3 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो सध्या सलाईनवर आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाल्मीक कराडला युरोसिस्टायसिसचा संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. सिस्टायसिस हा मूत्राशयाशी संबंधित आजार आहे. त्यात मूत्रमार्गात संसर्ग होतो. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्याची वैद्यकीय तपासणी केली. पण त्याची प्रकृती सातत्याने ढासळत आहे. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजारात रुग्णाचे यकृत निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळे वाल्मीक कराडला आता अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बीड तुरुंगात वाल्मीक कराड टोळीची दहशत उल्लेखनीय बाब म्हणजे बीड जिल्हा कारागृहात वाल्मीक कराडच्या गँगची मोठी दहशत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तुरुंगात कैद्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. या वादातून वाल्मीक कराड टोळीतील सुदर्शन घुले, प्रतीक घुले व शंकर शेप यांनी अजहर पठाण नामक दुसऱ्या एका कैद्याला बेदम मारहाण केली होती. यासंबंधी अजहर पठाणची एक ऑडिओ क्लिप माध्यमांत व्हायरल झाली होती. त्यात पठाण सांगतो की, माझ्या हाताला गंभीर इजा झाली आहे. तुरुंग प्रशासन माझे काहीही ऐकत नाही. त्यांनी पैसे घेतले आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. मला झालेल्या मारहाणीची मी तुरुंगाधिकाऱ्यांना माहिती दिली. पण त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. उलट मलाच दमदाटी करून जेल बदली करण्याची धमकी दिली. याची तक्रार कुठेही करा, माझे काहीही वाकडे होत नाही अशी धमकीही जेलरने मला दिली. तुरुंगात मला मारहाण होतानाचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. मला रुग्णालयातही नेण्यात आले नाही, असे अजहर पठाण या क्लिपमध्ये सांगताना ऐकू येत आहे. कोण आहे वाल्मीक कराड? वाल्मीक कराड हा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. तो सुरुवातीला परळीत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या ऑफिसमध्ये हाऊस बॉय (शिपाई) होता. त्यानंतर त्याने मुंडे कुटुंबाचा विश्वास संपादन केला. नंतर परळीच्या विद्यानगर वॉर्डातून नगरसेवक झाल्यावर नगराध्यक्षपदापर्यंत मजल मारली. मुंडे कुटुंबीयांत फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांना साथ देणारा कराड नंतर त्यांचा मित्र झाला. धनंजय मुंडे हे पहिल्यांदा आमदार झाल्यापासून ते मागील 5 वर्षांत तो मंत्री धनंजय मुंडे यांची सावली बनला. विशेष म्हणजे 1998 मध्ये तो परळीत व्हीसीआरवर सिनेमा दाखवण्याचा व्यवसाय करत होता. गेल्या 25 वर्षांत कराडवर 14 गुन्हे दाखल धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मीक कराडवर 1999 ते 2024 या 25 वर्षांत परळी शहर पोलिस ठाण्यासह बर्दापूर, अंबाजोगाई शहर व केज पोलिस ठाण्यात एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. एकट्या परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध जमाव जमवणे, मारामारीचे 4, खुनाचा प्रयत्न 1, रस्त्यात अडवल्याचे 3, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे 3 असे 10 गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिसांत त्याच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. केज तालुक्यात अवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी कराडसह इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. सध्या तो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *