![]()
कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडने (केएसएसएल) १२० मिमी क्षमतेची ‘रॅपिड अॅटॅक मॉर्टार सिस्टिम’ (आरएएमएस) विकसित करण्याच्या कामात टप्पा गाठला आहे. भारत फोर्ज लिमिटेडने ही माहिती दिली. ४×४ लष्करी वाहनावर बसवता येणाऱ्या या यंत्रणेतून सैनिकांना वाहनातून न उतरता मॉर्टार हल्ला करता येईल. पारंपरिक मॉर्टार यंत्रणा वाहनातून उतरवून जमिनीवर बसवावी लागते. या प्रक्रियेत वेळ जातो आणि सैनिकांना शत्रूच्या हल्ल्याचा धोका असतो. आरएएमएसमुळे वाहनातून हल्ला करून लगेच दुसऱ्या ठिकाणी जाता येईल. त्यामुळे लक्ष्य निश्चित झाल्यानंतर हल्ला करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि सैनिकांची सुरक्षितता वाढेल. डोंगराळ भागांतही वापर उंच पर्वतीय प्रदेश, वाळवंट आणि मैदानी भागांत वापरता येईल, अशा पद्धतीने या यंत्रणेची रचना केली जात आहे. कडाक्याची थंडी, प्रचंड उष्णता आणि पावसाळी परिस्थितीतही ती काम करेल, यावर भर देण्यात आला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागांत पारंपरिक मॉर्टार वाहून नेणे आणि तैनात करणे आव्हानात्मक असते. आरएएमएसमुळे या अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे. भविष्यातील युद्धांमध्ये लक्ष्य निश्चित करणे, तातडीने हल्ला करणे आणि त्यानंतर सुरक्षित ठिकाणी जाणे महत्त्वाचे ठरेल. या गरजा लक्षात घेऊन यंत्रणा विकसित केली जात आहे. भविष्यातील संरक्षणविषयक गरजांनुसार त्यात सुधारणा करण्याचीही सुविधा असेल. भारतीय लष्करासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी या यंत्रणेची रचना आणि विकास भारतातच होत आहे. भारतीय सशस्त्र दलांसह आंतरराष्ट्रीय ग्राहकांनाही ती उपलब्ध करून देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी तंत्रज्ञान विकास आणि निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भारत फोर्जचे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, भारताचे संरक्षण करण्याबरोबरच शत्रूच्या आक्रमणाचा सामना करणाऱ्या मित्रदेशांना मदत करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कठीण परिस्थितीतही सशस्त्र दलांना प्रभावी हल्ला करता यावा आणि सैनिकांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी आरएएमएस विकसित केली जात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘सशक्त भारत, सुरक्षित भारत’ या संकल्पनांना बळ देणारा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
वाहनातून न उतरता मॉर्टार हल्ला करता येणार:भारत फोर्जच्या केएसएसएलने विकसित केली 120 मिमी यंत्रणा; डोंगराळ भागांसह प्रतिकूल हवामानातही वापर शक्य