Headlines

विंचूरजवळ 18 लाखांचा अनुदानित युरिया जप्त:कृषी विभाग व पोलिस कारवाई; दोघांवर गुन्हा‎




निफाड तालुक्यातील विंचूरजवळील विष्णूनगर येथे अनुदानित युरियाच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७२८ गोण्या अनुदानित युरिया किंमत अंदाजे १८ लाख २० हजार तर दोन ट्रक किंमत सुमारे ७५ लाख असा एकूण सुमारे ९३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू पवार (रा. इंदिरानगर, विंचूर) आणि सागर किशोर गरड (रा. विंचूर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयशर (एमएच २३ एयू ५१९३) वाहनातून लातूर येथून अनुदानित युरियाचा साठा विंचूर परिसरात आणण्यात आला होता. विष्णूनगर येथील कांदा खळ्याजवळ हा साठा ट्रक (एमएच ५७ बी ६७७७) मध्ये व्यावसायिक विक्रीसाठी भरला जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पगार, पंचायत समिती निफाडचे कृषी अधिकारी संदीप मोगल, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक किरण साळुंके यांच्यासह कृषी व पोलिस पथकाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांचा संताप निफाड तालुक्यासह लासलगाव-विंचूर परिसरात युरियाची टंचाई असताना मोठ्या प्रमाणात अनुदानित युरिया काळ्या बाजारात वळविला जात असल्याचे उघड झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेटचा छडा लावून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *