Headlines

विजय वडेट्टीवारांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल:म्हणाले- मराठा तरुणांच्या नोकऱ्यांवर कायदेशीर प्रश्नाचा धोका




काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी मराठा तरुणांच्या आयुष्याशी खेळू नका, असे म्हटले. ओबीसी प्रमाणपत्रांच्या आधारे मिळालेल्या नोकऱ्यांवर भविष्यात कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, हातामध्ये शस्त्रे घेऊन किंवा हिंसेची भाषा करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलिसांची जबाबदारी आहे. कोणतीही मागणी कायद्याच्या चौकटीत राहूनच पूर्ण झाली पाहिजे, धमक्या देऊन किंवा हिंसेची भाषा करून प्रश्न सुटत नाहीत, असेही ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी ओबीसी जनगणना, आरक्षण आणि मराठा प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकार आणि आंदोलकांवर टीका केली. ईम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ओबीसींची लोकसंख्या सुमारे ६० टक्के असताना ती २८ ते ३० टक्के दाखवणे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगत ओबीसींना त्यांचा घटनात्मक हक्क मिळेपर्यंत लढा तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघावरही त्यांनी टीका केली. सरकारकडून लाभ घेतलेल्या संघटना सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारच्या भरवशावर ओबीसींच्या हक्काची लढाई लढता येणार नाही, असे सांगत योग्य वेळ आल्यावर या संदर्भातील माहिती जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *