Headlines

विदर्भात जलसमृद्धीच्या स्वप्नपुर्तीसाठी‎निर्धारित कामे समन्वयातून पूर्ण करा‎:जलसंपदा प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे आवाहन; प्रकल्पाचा आढावा‎




प्रतिनिधी | खामगाव विदर्भाच्या जलसमृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व निर्धारित काल मर्यादित काम पूर्ण करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. विदर्भाच्या जलसुरक्षेला नवी गती मिळण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड व जिगांव प्रकल्पांच्या प्रगतीचा प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी ३० मे रोजी क्षेत्रीय आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी २८ ते ३० मे या कालावधीत राज्यातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा दौरा केला. त्यासोबतच निम्न वर्धा, आर्वी उपसा सिंचन योजना व जिगांव या प्रकल्पांचा समग्र आढावा क्षेत्रियस्थळी घेण्यात आला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध बांधकाम स्थळांना भेटी देत प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व आवश्यक दिशा-निर्देश दिले. शासनाच्या महत्वाकांक्षी असणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान प्रधान सचिवांनी गोसीखुर्द प्रकल्पापासून नळगंगा प्रकल्पापर्यंतच्या प्रस्तावित संरेखेवरील विविध अभियांत्रिकी संरचनांची पाहणी केली. यामध्ये इंटेक स्ट्रक्चर, कालवा पूल, जलसेतू, सायफन, एस्केप, बोगदे, मार्गस्थ साठवण तलावांचा समावेश होता. प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेचा आढावा घेताना त्यांनी आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा तत्काळ विचारात घेण्याचे निर्देश दिले. प्रकल्पाच्या वेळेत पूर्ततेसाठी आवश्यक प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या सूचना संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच वनजमिनीच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी वन विभाग व जलसंपदा विभाग यांच्यात प्रभावी समन्वय राखण्यावर भर देण्यात आला. यावेळी प्रधान सचिव डवले यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा विदर्भाच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा कणा ठरणारा प्रकल्प असल्याचे नमूद केले. सिंचन क्षमता वाढविणे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे या दृष्टीने प्रकल्पाचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. दौऱ्यादरम्यान शेगाव येथे आयोजित बैठकीत जिगांव प्रकल्पाच्या भूसंपादन व पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, भूसंपादन अधिकारी व महसूल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चालू आर्थिक वर्षातील उपलब्ध निधीचे सुयोग्य नियोजन करून प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पांची स्थिती, उपलब्ध पाणीसाठा व सिंचन लाभाबाबत माहिती सादर करण्यात आली. प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवून जलसंपत्तीचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या दौऱ्यादरम्यान विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता अमरावती जगत टाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अप्पर जिल्हाधिकारी एस.एन.खांदे, जिगाव प्रकल्प अधीक्षक अभियंता श्रीराम हजारे, बापूसाहेब गाडे, अनुराग सावरकर, खैरनार यांच्यासह संबंधित कार्यकारी अभियंते, भूसंपादन अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान विभगाला विविध सुचनाही करण्यात आल्या आहेत. शेगाव येथे बैठकीत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव डवले व उपस्थित अधिकारी शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी जिल्ह्यातील जिगांव धरण प्रकल्प व उपसा सिंचन योजना क्र. ७ मनसगाव येथील कामांची प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जिगांव प्रकल्पांतर्गत प्रथम टप्प्यातील पाणीसाठा निर्माण करण्याची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ११,३५० हेक्टर क्षेत्रामध्ये दाबयुक्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेवर, खात्रीशीर आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कृषी उत्पादनवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *