![]()
खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहनशीलता आणि खिलाडूवृत्ती निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळालाही महत्त्व द्यावे आणि खेळभावना जपावी. तसेच कोणत्याही अमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग आणि आर.डी.आय.के. महाविद्यालय, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात तीन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुभाष गावंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देशमुख, डॉ. विकास टोणे, डॉ. हेमंत देशमुख आणि ॲड. उदय देशमुख उपस्थित होते. यावेळी सर्व खेळाडूंनी खेळभावनेतून स्पर्धेत सहभागी होण्यासह खेळामध्ये अमली पदार्थांचा वापर करणार नसल्याची शपथ घेतली. या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यांतील १३६ महाविद्यालयांच्या १,२१४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुभाष गावंडे यांनी खेळात यश मिळविण्यासाठी सहनशीलता, ताकद आणि चपळता आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पार्थ सावरकर, हर्ष मोहन, मुन्सिफ अली, वैभव गवई, स्वराज भोपळे आणि शामिक्षा आमझारे या खेळाडूंनी मशाल घेऊन क्रीडाज्योत आणली.
Source link
विद्यार्थ्यांनी खेळभावना जपत अंमली पदार्थांपासून दूर राहावे- डॉ. बारहाते:विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत 136 महाविद्यालयांतील 1,214 खेळाडू सहभागी